आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाेळसांना लाजवेल असा विकास करू, मनसेच्या अंशत: अंध उमेदवाराचा मुंबईत निर्धार (महाकाैल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - “ मी जरी अंशत: अंध असलो, तरीही माझा पक्ष मला तसे समजत नाही. अनेक जण इच्छुक असतानाही, मनसेने माझ्यासारख्या व्यक्तीवर विश्वास ठेवून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन,’ अशी भावना व्यक्त करत मुंबईतील मनसेचे उमेदवार विनोद अरगिले यांनी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.
 
जन्मत:च ८० टक्के अंधत्व असूनही राजकारणासारख्या धकाधकीच्या क्षेत्रात फक्त शिरकावच नव्हे, तर गेली पंधरा वर्षे सक्रिय असलेल्या अरगिलेंच्या निवडणुकीकडे अवघ्या मुंबईचे लक्ष लागले आहे.   

दक्षिण मुंबईतील कामाठीपुऱ्याची वस्ती.. दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या उपकरप्राप्त इमारतींची गर्दी आणि झोपडपट्टीने व्यापलेला हा परिसर..वेश्यांच्या वस्तीमुळे नाहक बदनाम झालेला भाग.. अनेक समस्यांनी व्यापलेलं इथल्या रहिवाशांचं जगणं.. या समस्यांवर उपाययोजना करण्याचे आश्वासन देत आजवर इथे अनेकांनी निवडणुका जिंकल्या, पण आजही हे प्रश्न कायम आहेत. “आजवर निवडून आलेल्या अनेक डोळस नगरसेवकांना कामाठीपुऱ्यातील समस्या दिसल्या नाहीत. पण मला त्या समस्या जाणावतात आणि मी त्या नक्कीच सोडवू शकतो,’ प्रभाग २१३ मधील मनसेचे उमेदवार विनोद अरगिले सांगत होते.  
 
‘अंध असतानाही तुम्ही जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडाल, असा विश्वास वाटतो का?’  या प्रश्नावर ते म्हणाले, ‘मी अंध आहे, पण जे डोळस आहेत त्यांनी आजवर आमच्या प्रभागासाठी काय केले, हा माझा प्रश्न आहे. त्यांच्यापेक्षा तर नक्कीच मी चांगले काम करेन. कोणतीही निवडणूक न लढवताही मी माझ्या प्रभागात १५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारी हायवो मशीन बसवली. राज ठाकरेंसोबत भारतीय विद्यार्थी सेनेच्या काळापासून मी काम करतो आहे.
 
कामाठीपुऱ्यातील लोकांंना माझ्या कामाबद्दल माहिती आहे. मी कधीच पक्षाकडे उमेदवारी मागितली नव्हती. यंदाही न मागताच पक्षाने जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे पक्षनेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पराकाष्ठा करेन,’ असे ते म्हणाले. अरगिले महापालिकेत निवडून गेल्यास कदाचित पहिल्यांदाच एक अंध व्यक्ती नगरसेवकपदी विराजमान झाल्याची इतिहासात नोंद होईल.
 
बातम्या आणखी आहेत...