आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरे सोडणार मौन, रविवारी कार्यकर्त्यांना संबोधित करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर रान पेटलेले असताना आतापर्यंत या मुद्द्यावर गप्प असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या रविवारी आपले मौन सोडणार आहेत. याशिवाय “सामना’मध्ये आलेल्या व्यंगचित्राच्या मुद्द्यावरून शिवसेनेची झालेली कोंडी आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने बदललेली भूमिका यावरही ते भाष्य करतील, अशी माहिती मनसेतील सूत्रांनी दिली आहे.

रविवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे संध्याकाळी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या मेळाव्यात राज कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ते नेमके काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे. सध्या राज्यभरात निघत असलेल्या लाखोंच्या मराठा मोर्चांना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला असताना मनसेने मात्र अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. आरक्षण हे आर्थिक निकषांवर असावे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी यापूर्वीच्या अनेक सभांमध्ये मांडली असली तरीही मराठा मूकमोर्चांनंतर आरक्षणाचा मुद्दा राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील बनला आहे. याशिवाय “सामना’तील व्यंगचित्रावरून शिवसेनेची झालेली राजकीय कोंडी पाहता शिवसेनेवर टीका करण्याची आयती संधी राज यांच्यासमोर चालून आली आहे. अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या महापालिका निवडणुका पाहता ही संधी राज ठाकरे दवडणार नाहीत, असेच अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. एकूणच त्यांच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाक कलाकारांनी देश सोडला : खोपकर
मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर भारतात एकही पाकिस्तानी कलावंत नसल्याचा दावा मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेने केला आहे. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जर यापुढे एकही पाकिस्तानी कलावंत चित्रपट, नाटक किंवा मालिकांमध्ये काम करताना आढळला तर त्याच्यासोबत निर्मात्यालाही चोप देऊ, अशी धमकी खोपकर आणि ठाकरे यांनी दिली. करण जोहरच्या “एे दिल है मुश्किल’ आणि शाहरुख खानच्या “रईस’ चित्रपटाबाबत याआधी घेतलेल्या भूमिकेवरच ठाम असल्याचा पुनरुच्चार मनसेकडून करण्यात आला. पाकिस्तानी कलावंतांच्या मुद्द्यावर कुठलीही तडजोड होणार नाही, हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका खोपकर आणि ठाकरे यांनी मांडली.
बातम्या आणखी आहेत...