आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मनसे’अस्त्र भेदून बालेकिल्ल्यावर ताब्याचा सेनेचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दक्षिण मध्य मुंबई हा एकेकाळचा शिवसेनेचा बालेकिल्ला.. पण सध्या या भागात मनसे आणि काँग्रेसमुळे शिवसेनेची स्थिती केविलवाणी झाली आहे. मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे या तरुण आणि उच्चशिक्षित उमेदवाराला शिवसेनेने याच मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवून गतवैभव मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुुरू केले आहेत. पण त्यांच्यासमोर आव्हान असेल ते दांडगा लोकसंपर्क आणि संसदेत सर्वाधिक काळ उपस्थिती असलेले काँग्रेसचे विद्यमान खासदार एकनाथ गायकवाड यांचे आणि राज ठाकरेंच्या मनसेचे.

अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा आणि माहीम हे सहा विधानसभा मतदारसंघ या ‘लोकसभे’त येतात. यापैकी अणुशक्तीनगर राष्ट्रवादीकडे, तर माहीममध्ये मनसेचा आमदार आहे. मात्र वडाळा, सायन-कोळीवाडा, धारावी आणि चेंबूर हे चार मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. विविध जाती-धर्मांचा, उत्पन्न गटाचा आणि भाषिक सरमिसळ असलेला हा मतदारसंघ. माहीममध्ये उच्चभ्रूंची वस्ती, वडाळ्यात मराठी मध्यमवर्गीय, अणुशक्तीनगरमध्ये मुस्लिम प्राबल्य, तर धारावी आणि चेंबूरमध्ये मोठी दलित व्होट बँक. सोबतीला दाक्षिणात्य आणि पंजाबींची संख्याही मोठी. एकीकडे धारावीसारखी मोठी झोपडपट्टी, तर दुसरीकडे दादर, माहीम आणि माटुंग्यातली पॉश कॉलनी अशा संमिश्र लोकवस्तीत सध्या तरी काँग्रेसची बाजू वरचढ दिसते.

मृदुभाषी असलेल्या एकनाथ गायकवाड यांना आपल्या दांडग्या संपर्काबरोबरच कन्या आणि राज्याच्या महिला बालकल्याणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतल्या कामगिरीचाही फायदा होणार आहे. मात्र, काँग्रेसमधील गटबाजीचा फटकाही बसण्याचा धोका आहे. कारण वडाळ्यातील आमदार कालिदास कोळंबकर हे राणे समर्थक आहेत, तर सायनचे जगन्नाथ शेट्टी आणि चेंबूरचे चंद्रकांत हंडोरे हे गुरुदास कामत गटाचे. गेल्या वेळी कामत या मतदारसंघातून स्वत:च इच्छुक होते. मात्र, उमेदवारी गायकवाडांनी मिळवली. त्यामुळे कामत आणि गायकवाड यांच्यात फारसे सख्य नाही. असे असले तरी शिवसेनेतील गटबाजीवर मात्र गायकवाडांचा डोळा आहे.

मनोहर जोशींची भूमिका शंकास्पद
या मतदारसंघातून शिवसेना नेते मनोहर जोशी इच्छुक होते. मात्र, उमेदवारी मिळत नसल्याचे कळताच त्यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभे केले होते. जाहीर अपमानानंतर जोशींनी पक्षाशी जुळवून घेतले असले तरी त्यांचे समर्थक शेवाळेंचे काम कितपत करतील याबाबत शंकाच आहे. मध्यंतरी नाराज सदा सरवणकरांना पुन्हा सेनेत आणल्याने दादर-माहीम भागात सेनेला पुन्हा संजीवनी मिळाली आहे. त्यातच शेवाळे यांच्यासारखा उमदा उमेदवार दादर-माहीममधील उच्चभ्रूंची मते पुन्हा वळू शकतील, अशी सेनेला आशा आहे.

उद्धव ठाकरेंना कोणत्याही परिस्थितीत हा ‘बालेकिल्ला’ परत मिळवायचा आहे. पण हे आव्हान फारच कठीण आहे. कारण महापालिका निवडणुकीत मनसेने दादर-माहीममधल्या सगळ्या जागा जिंकत सेनेला पाणी पाजले होते. त्यातच माहीममध्ये आमदार नितीन सरदेसार्इंनी चांगलाच जम बसवल्याने मनसेचे उमेदवार आदित्य शिरोडकरांना लाभ होऊ शकतो. मनसेचे सरचिटणीस राजन शिरोडकर हे राज ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय. त्यांच्या मुलासाठी राज ठाकरेही मैदानात उतरणार यात शंकाच नाही.

खरी लढत सेना-काँग्रेसमध्येच
मनसेने गेल्या वेळी या भागात लाखभर मते मिळवली होती. मात्र, तरीही खरी लढत कॉँग्रेसचे एकनाथ गायकवाड विरुद्ध शिवसेनेचे राहुल शेवाळे अशीच होण्याची शक्यता आहे. प्रचाराच्या मध्यावर जर राज ठाकरेंनी काही जादू केली तरच चित्र तिरंगी लढतीत बदलू शकते. मनसेला मिळणारी मते ही उमेदवारापेक्षा राज ठाकरेंकडे पाहूनच मिळतील. शिवाय या निवडणुकीत नेहमीप्रमाणे धारावी या आशियातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा पुनर्विकास हा मुद्दा सर्वच पक्षांच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा असेलच.

एकनाथ गायकवाड यांची बलस्थाने
मृदुभाषी, धारावीत चांगलीच लोकप्रियता, 1158 शौचालये बांधण्याची आगळीवेगळी कामगिरी, 12 डब्यांच्या हार्बर लोकलसाठी गेली पाच वर्षे संसदेत पाठपुरावा, कॅबिनेट मंत्री कन्येच्या कामांचाही फायदा होण्याची शक्यता.

उणिवा : पक्षातल्या विरोधी गटाला बरोबर आणण्यात अपयशी, विजयाची सगळी मदार धारावीतील झोपडपट्टी आणि दलित मतांवर असेल.

राहुल शेवाळे यांची बलस्थाने
गेली पंधरा वर्षे महापालिकेत नगरसेवक. सध्या स्थायी समितीचे सभापती. उद्धव ठाकरेंची खास मर्जी. सिव्हिल इंजिनिअर असल्याने सुशिक्षित मतदारांना आकर्षित करण्याची क्षमता.

उणिवा : पक्षांतर्गत गटबाजीचा धोका. स्वत: चर्मकार समाजाचे असल्याने नवबौद्ध मतदारांचे प्राबल्य असलेल्या तीन विधानसभा मतदारसंघांत फटका बसण्याची शक्यता.