आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Will Fix Its Lok Sabha Contestants List In Pune, Attension To Raj Thakare View

मनसेचे उमेदवार पुण्यात ठरणार,राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या शुक्रवारी पुण्यात एका बैठकीचे आयोजन केले आहे. यात महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या वेळी मनसेच्या लोकसभा उमेदवारांच्या नावांबाबत प्राथमिक चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीला पक्षाचे सर्व सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष, संपर्क अध्यक्ष आणि मुंबईतील विभाग अध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे. लोकसभेसाठी मनसे उमेदवारांच्या नावांची चाचपणी करणे हा या बैठकीचा प्रमुख उद्देश आहे. पुण्याच्या नगरसेवकांच्या आढावा बैठकीनंतर ही बैठक होणार आहे.
साधारण वर्षभरापूर्वी राज यांनी मुंबईच्या विभाग अध्यक्षांना विविध जिल्ह्यांच्या संपर्क अध्यक्षपदी नेमले होते. त्या वेळी त्या त्या जिल्ह्यात पक्षाबाबत असलेले वातावरण आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करण्याची जबाबदारी या संपर्क अध्यक्षांवर सोपवण्यात आली होती. त्यानुसार तयार केलेले हे अहवाल शुक्रवारच्या बैठकीत ठाकरेंकडे सोपवले जाणार आहेत. त्याचबरोबर मनसेच्या आमदारांनीही विविध जिल्ह्यांचे दौरे केले असून त्यांच्या अहवालाची चर्चा या वेळी केली जाणार आहे. पक्ष किती जागांवर लोकसभेची निवडणूक लढवू शकतो, याचा अंदाजही या बैठकीत घेतला जाणार आहे. त्याचबरोबर येत्या निवडणुकीत मनसेची काय राजकीय भूमिका असेल याबाबतसुद्धा राज आपली मते नेत्यांसमोर स्पष्ट करणार आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केल्याने मनसे आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळे मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता अधिक आहे.
प्रचारादरम्यान मनसेसमोर मोठे आव्हान असणार आहे. कारण गेल्या निवडणुकीत मनसेच्या अजेंड्यावर असलेला मराठी अस्मितेचा मुद्दा आता मागे पडला आहे. त्यातच नाशिकमध्ये सत्ता मिळाल्यानंतरही पक्ष फारसा चमक दाखवू शकला नाही. त्यामुळे या वेळी प्रचाराचा नेमका मुद्दा काय असेल, याबाबतही अनेकांच्या मनात कुतूहल आहे.
त्यामुळे एकूणच लोकसभेच्या दृष्टीने ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे.