आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi, AAP Effect On Congress Policy, Prority To Wealfare Schemes

काँग्रेसच्या धोरणांवर मोदी, ‘आप’चा प्रभाव; भविष्‍यात कल्याणकारी योजनांना प्राधान्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशभरात दिसून येणा-या ‘आप’ व मोदी इफेक्टचा कॉँग्रेसने चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळे भविष्यात कल्याणकारी योजनांना प्राधान्य देतानाच दुसरीकडे आर्थिक विकासाला चालना देणारे समतोल आर्थिक धोरण राबवण्यावर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये विचारमंथन सुरू आहे.
सव्वाशे वर्षे जुन्या काँग्रेस पक्षात आमूलाग्र बदल घडवण्याची घोषणा काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी उपाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताच केली होती. मात्र, काही निवडक गोष्टी वगळता अद्यापही या पक्षाने बदल स्वीकारलेला नसल्याचे दिसून येते. पक्षात संघटनात्मक पातळीवर निवडणुका घेऊन नेता निवडीचा पायंडा राहुल यांनी युवक कॉँग्रेसमध्ये पाडला खरा; परंतु त्यापलीकडे त्यांना जाता आलेले नाही. दरम्यान, सध्या देशात मोदी व आपचा प्रभाव वाढत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीनुसार आपल्याही पक्षाच्या धोरणांमध्ये बदल घडवण्याचा मतप्रवाह काँग्रेसमध्ये दिसत आहे. काँग्रेसचे उमेदवार दिल्लीतूनच ठरतात, ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी आता ‘आप’प्रमाणे जनाधार उमेदवार निवडीची प्रक्रिया यंदा कॉँग्रेस राबवण्याच्या तयारीत आहे. शुक्रवारी सेवाग्राम येथे पंचायत राज संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी तसे संकेत दिले आहेत. देशभरातील किमान 15 मतदारसंघांमध्ये पंचायत राज संस्थांमधील प्रतिनिधींपासून वरच्या स्तरापर्यंतचा मतप्रवाह जाणून उमेदवार द्यायचे, असा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत हा प्रयोग यशस्वी ठरल्यास आणखी पुढे जायचे, अशीही काँग्रेसची रणनीती आहे.
आर्थिक धोरणाचे दोन अ‍ॅक्सिलरेटर
आर्थिक धोरणाच्या आघाडीवरदेखील काँग्रेसने मोदी आणि आप इफेक्टची चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे एकीकडे तिजोरीवर भार टाकून कल्याणकारी योजना राबवतानाच आर्थिक विकासाला चालना देणारे समतोल आर्थिक धोरण राबवण्याची योजनाही कॉँग्रेसकडून मांडली जाण्याचे स्पष्ट संकेत आहेत. आर्थिक धोरणाचे गाडे हाकताना दोन्ही अ‍ॅक्सिलरेटरवर समान दबाव राहील, अशी भूमिकाही कॉँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी बोलून दाखवली.