आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Ask Youth To Work For Contrys Dream, Divya Marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विद्यार्थ्यांना हाक, पायाभूत सुविधांच्या विकासावर भर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी राज्याच्या दौर्‍यावर आले होते. या दौर्‍यात त्यांनी वीज बचतीचा नारा दिला. आमदार, खासदार होऊन देशसेवा करता येते तशीच देशसेवा विजेची बचत करूनही करता येते, ते काम विद्यार्थ्यांनी करावे, अशी साद त्यांनी घातली.

सोलापूर-रायचूर ट्रान्समिशन लाइनचे लोकार्पण आणि सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या सोलापूर-येडशी या पहिल्या टप्प्याचा पायाभरणी समारंभही त्यांच्या हस्ते झाला. पायाभूत सुविधा वाढल्या तर देशात सोने पिकविले जाईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या वेळी राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री पीयूष गोयल, विरोधी पक्षनेते विनोद तावडे आदींची उपस्थिती होती. तत्पूर्वी मोदी यांच्या हस्ते उरणच्या न्हावाशेवामध्ये जेएनपीटीच्या विशेष आर्थिक क्षेत्राची (सेझ) पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली होती.
आजार जुना, डॉक्टर नवा
उरणच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री चव्हाण यांनी राज्यातील 23 सेझ बंद पडले असल्याकडे लक्ष वेधले. त्यावर मोदी म्हणाले, हा आजार जुनाच आहे. मात्र मुख्यमंत्री कदाचित आधीच्या सरकारशी (यूपीए) बोलू शकले नसतील. कधी कधी जुन्या आजारावर उपचार करण्यासाठी माझ्यासारख्या नव्या डॉक्टरांची गरज भासते.
विजेसाठी कोळसा द्या
चार-पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रकल्पाचे आज उद्घाटन होत आहे, ही आनंदाची बाब आहे. रस्ते पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्र उद्योगात देशात नंबर वन आहे. जर महाराष्ट्राला आणखी कोळसा मिळाला तर वीजनिर्मितीच्या अडचणी दूर होतील आणि महाराष्ट्राचा विकास आणखी झपाट्याने होईल. त्यामुळे राज्याला लवकरात लवकर कोळसा द्या असेपृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
मीही कोळसाच मागत होतो
एकेकाळी महाराष्ट्र खूप पुढे होता. आज वीज निर्मिती बंद पडली आहे. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना कोळसा मागत होतो. तेव्हा त्याकडे लक्ष दिले नाही. आज ती वेळ तुमच्यावर आली. सरदार सरोवराची उंची वाढली तर महाराष्ट्राला 400 कोटींची वीज मोफत मिळेल. हे काम झाले तर राज्यात 24 तास वीज मिळते, असे मुख्यमंत्री (चव्हाण) सांगू शकले असते, असे मोदी म्हणाले.

देशासाठी दहा-दहा रुपये वाचवा
निवडणुका लढवून मंत्री बनून सेवा करावी, तेवढीच सेवा वीज बचत करूनही करता येते. विद्यार्थी हे काम करू शकतात. रोज रात्री जेवताना विजेच्या बिलावर चर्चा करा. ती वाचविण्याचे ठरवा. त्यातून दहा- दहा रुपये वाचले तरीही मोठे काम होईल. खर्च वाचेल. गरिबांना झोपडीत वीज मिळेल. आमदार, खासदार होऊन आणि लष्करात भरती होऊन देशसेवा करता येते, तशीच वीज वाचवूनही करता येते.