आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Govt Lifted Ban Of Bullock Cart Race, Farmers Celebrates

बैलगाडा शर्यतीवरील बंदी केंद्राने उठवल्याने बैलगाडा मालकांकडून स्वागत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ मुंबई- महाराष्ट्राच्या गावा-गावांत लोकप्रिय व प्रसिद्ध असलेल्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी अखेर केंद्र सकारने उठवली आहे. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या विभागाने हा निर्णय जाहीर केला. गेल्या दोन-तीन वर्षापासून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी यासाठी विविध भागातील लोकप्रतिनिधी केंद्र सरकारला साकडे घालत होते. मात्र, केंद्रात मोदी सरकार येताच पर्यावरण विभागाचे मंत्री जावडेकर यांनी बैलगाडा शर्यत सुरु करण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते. मात्र, अखेर यावर मोहोर उमटवली गेली आहे. राज्याच्या विविध भागांतील बैलगाडा मालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याचे पक्षाने म्हटले असले तरी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, शिरूरचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी यावरील बंदी उठवावी यासाठी वेळोवेळी केंद्राला साकडे घातले होते. मात्र, यूपीए सरकारने शर्यतीद्वारे बैलांचा, पाळीव प्राण्याचा छळ केला जातो असे सांगत बंदी 2011 मध्ये घातली होती. याला पर्यावरणवादी व प्राणी संघटनांच्या सदस्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, या बंदीविरोधात देशभरातील शेतक-यांनी एकत्र येत अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना स्थापन केली होती. याद्वारे देशभर विविध ठिकाणी शेतक-यांनी आंदोलने केली होती. बैलगाडा मालकांनी अनेक ठिकाणी उपोषणही केले होते. मात्र, केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारने यातील कोणालाही जुमानले नव्हते.
2014 साली केंद्रात सत्तांत्तर घडले. त्यानंतर बैलगाडा मालकांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे बंदी उठवण्याची मागणी केली होती. त्यावेळी जावडेकरांनी सकारात्मक तोडगा काढणार असल्याचे म्हटले होते. यातील सर्व कायदेशीर त्रुटी दूर करून अखेर बंदी उठवली गेली आहे. दरम्यान, याविरोधात पाळीव प्राणी संघटनेचे कार्यकर्ते कोर्टात जाण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र, सरकारने सर्व कायदेशीर त्रुटी दूर करून हा निर्णय घेतला आहे.