आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi News In Marathi, Prime Minister Candidature, BJP

मोदी लाटेवर ‘स्वार’ झालेल्या भाजपचे दोन्ही डगरींवर हात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर झाल्यापासून राज्यात भाजपचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. 1995 चा अपवाद वगळता आजवर महाराष्‍ट्रात युतीला सत्तेबाहेरच राहावे लागले. यंदा देशभर मोदींची लाट असल्याने केंद्रात एकदा ‘एनडीए’चे सरकार आले की विधानसभेलाही राज्यात भगवा फडकणारच, अशी युतीच्या नेत्यांना आशा आहे. राज्यातील भाजपच्या नेत्यांना लोकसभेची निवडणूक म्हणजे विधानसभेची रंगीत तालिम वाटते... म्हणूनच मनसे व शिवसेना अशा दोन टोकांच्या पक्षांना एकाचवेळी गोंजारण्याचा खेळ भाजपकडून सुरू आहे.
कॉँग्रेस- राष्‍ट्रवादीविरोधात रान पेटवण्याची एकही संधी भाजप नेते सोडत नाहीत. तसेच काँग्रेसविरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी सर्व शक्यता ते पडताळून पाहत आहेत. गोपीनाथ मुंडे एकीकडे उद्धव ठाकरेंना गळामिठी मारून बसलेत... तर शेवटच्या क्षणी नितीन गडकरींनी राज ठाकरेंना जवळ केले आहे. निवडणुकांच्या तोंडावर मित्रपक्ष जोडण्यासाठी गडकरींनी पुढाकार घेणे हा योगायोग नक्कीच नाही. त्यामागे विधानसभा निवडणुकांची रणनिती आहे. लोकसभेतील यशावर भाजपला विधानसभेत नवीन समीकरणे रचायची आहेत. भले मग शिवसेनेशी जूनी मैत्री तुटली तरी त्यांना काही फरक पडत नाही. भविष्यात मनसे, राष्‍ट्रवादी अशी नवी आघाडी करायला ते मागे पुढे पाहणार नाहीत.


महायुतीचा विस्तार मुंडेंकडून
आघाडी सरकारला चुड लावण्यात सर्वात आघाडीवर आहेत ते गोपीनाथ मुंडे. त्यांचा जीव दिल्लीपेक्षा महाराष्‍ट्रातच जास्त रमतो. विशेषत: शरद पवार व अजित पवार यांच्याविरोधात हल्लाबोल करण्यालाच मुंडेंचे प्राधान्य असते. त्यासाठीच त्यांना यंदा पश्चिम महाराष्‍ट्रावर विशेष लक्ष दिले आहे. ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी व राष्‍ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना जवळ काँग्रेसविरोधी मतांचा एक गठ्ठा बांधण्याचे श्रेयही मुंडेंनाच जाते.


मुंडे हे भाजपचे ख-या अर्थाने लोकनेते आहेत. राज्याचा कानाकोपरा पिंजून काढताना संघटन वाढवण्याची जन्मजात कला त्यांना लाभली आहे. मुंडेंचे हे मोठेपण गडकरींना नेहमीच बोचते. परिणामी भाजपमध्ये अनेक वर्षांपासून मुंडे विरुद्ध गडकरी असे दोन गट दिसतात. मुंडेंचे कोण आणि गडकरींचे किती, अशी गणिते बांधूनच पक्षातील कामाची दिशा ठरवावी लागते. याचाच एक भाग म्हणजे मुंडेंचा पवारांना टोकाचा विरोध असताना गडकरी मात्र त्यांच्याशी कायम संधान बांधून असतात. भाजपचे दोन दगडावर पाय ठेवण्याची कला या दोन नेत्यांच्या परस्पराविरोधी राजकारणातून आलेली दिसते.


... तर राजू शेट्टींचा सवतासुभा
पश्चिम महाराष्‍ट्रात ऊस उत्पादकांच्या हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सरकारविरोधी अक्षरश: रान उठवत असतात. त्यांना महायुतीच्या झेंड्याखाली आणण्याचे मोठे काम मुंडेंनी केले आहे. शेट्टींच्या या झंझावातामुळेच हातकणंगलेत (जि. कोल्हापूर) कोणत्याही राजकीय पक्षांचा पाठिंबा नसताना ते केवळ शेतक-यांच्या जिवावर खासदार झालेत.


फक्त हातकणंगलेच नव्हे तर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या साखरपट्ट्यात शेट्टींची मोठी ताकद आहे. त्यामुळे आगामी निवडणुकात शेट्टी सत्ताधा-यांच्या तोंडाला फेस आणण्याची मोठी भूमिका बजावू शकतात. शरद पवार यांना विरोध हा शेट्टींच्या राजकारणाचा मुख्य अजेंडा आहे. मात्र गडकरी मनसेच्या आडोशाला उभे करून राष्‍ट्रवादीलाही खुणावत असतील तर शेट्टी ते खपवून घेणार नाहीत. कदाचित विधानसभेला ते वेगळाही विचार करू शकतात.


लोकसभेतील बलाबल
09 भाजप खासदार 2009 मध्ये
17 जागा मिळविण्याचे
आता पक्षाचे लक्ष
32 जागा मिळविण्याचे
महायुतीचे टार्गेट
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्‍ट्र, मुंबईवर भाजपचे विशेष लक्ष