आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Not Name Shiv Sena In His Election Rally In Maharashtra, Divya Marathi

शिवसेनेला अनुल्लेखाने मारणार, मोदींचा भर विकासाच्या मुद्द्यांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसाठी ‘ब्रह्मास्त्र’ ठरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील प्रचार सभांचा धडाका शनिवारपासून सुरू होत आहे. युती तुटल्यानंतर शिवसेनेने आपल्या प्रचारात भाजपवर थेट हल्ला करण्यास सुरुवात केल्याने मोदी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभांमध्ये शिवसेनेला प्रत्युत्तर देण्याऐवजी अनुल्लेखाने मारण्याचे धोरण अवलंबवतानाच मोदींचा भर विकासाच्या मुद्द्यांवर राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शनिवारी औरंगाबाद, बीड आणि मुंबई येथे मोदींच्या सभा होत आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यापासून प्रचाराची सुरुवात होत असल्याने ते काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे. भाजपच्या एका बड्या नेत्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोदी हे शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तर देणार नसून ती जबाबदारी प्रदेश भाजपच्या प्रमुख नेत्यांवरच सोपवण्यात आली आहे. याचे उदाहरण म्हणजे एकनाथ खडसेंनी आज शिवसेनेच्या नेत्यांना "मातोश्रीचे पोपट' संबोधले असल्याकडे भाजपच्या नेत्याने लक्ष वेधले. प्रचारादरम्यान मोदींच्या टीकेचा रोख हा प्रामुख्याने गेल्या पंधरा वर्षांत आघाडी सरकारने केलेल्या कारभारावर असेल. केंद्रात सत्तेवर आल्यावर सरकारने केलेली कामेसुद्धा ते लोकांसमोर मांडणार आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली लढलेल्या गुजरात विधानसभा असोत किंवा नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक असो, या निवडणुकांमधून मोदींची विकासपुरुष अशी प्रतिमा तयार करण्यात आली आहे. मोदींच्या या प्रतिमेचा वापर करत लोकांचा आघाडी सरकारवर असलेला राग मतांमध्ये परावर्तित करण्याची रणनीती भाजपच्या गोटात आखण्यात आली आहे.

सिंहगर्जना सभेची तयारी
मोदींच्या मुंबईत होणा-या सिंहगर्जना सभेचे आयोजन मुंबई भाजपतर्फे केले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, लोकसभेपूर्वीची सभा पूर्ण देशासाठी होती. त्यामुळे तिचे आयोजन अतिभव्य स्वरूपात करण्यात आले होते. आजची सभा फक्त मुंबई आणि राज्यापुरती असल्याने ती महागर्जना सभेइतकी भव्य नसेल. शिवाय ही प्रचारसभा आचारसंहितेच्या काळात होत असल्याने साधेपणाने होईल. मोदींचे भाषण आमच्यासाठी महत्त्वाचे आहे मोदींच्या सिंहगर्जना सभेला सर्व मित्रपक्षांचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत.