आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींचा ‘डुप्लिकेट’ही वर्षपूर्ती सोहळ्यात बिझी, स्वत:चा वाढदिवस साजरा करणे टाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्रातील भाजप सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी िजतके व्यग्र होते, तितकाच बिझी दिनक्रम मोदी यांचा मुंबईतील डुप्लिकेट विकास महंते यांचाही राहिला. मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी अायाेजित केलेल्या वर्षपूर्तीच्या डझनभर कार्यक्रमांना महंते यांनी हजेरी लावल्याने सामान्य नागरिक व कार्यकर्त्यांना जणू माेदीच अाल्याचा भास हाेत हाेता.
भाजप आणि केंद्र सरकारच्या विभागांनी मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मंगळवारी विविध कार्यक्रमांचे अायाेजन केले हाेते. मुंबई शहरातही डझनभर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांना मंत्री हजर होते तसे पदाधिकारीही होते. पण लक्ष वेधून घेतले ती असामी होती मोदी यांचा प्रसिद्ध डुप्लिकेट विकास महंते हा मराठी माणूस. सकाळी प्रभादेवीच्या ‘वर्ष एक, निर्णय अनेक’ या चित्रप्रदर्शनाचे उद‌्घाटन. बारा वाजता चेंबूरच्या उद्यानाचे, तर चार वाजता शीवमधील कामगार संघाच्या कार्यालयाचे उद‌्घाटन, नंतर भाजप प्रदेश कार्यालयासमोर जल्लोष व रात्री क्रिकेट स्पर्धेचे उद‌्घाटन असा दिनक्रम ‘हमशकल मोदीं’चा होता. अधूनमधून चॅनलवाल्यांना बाइट, सेल्फीची घाई असे प्रकार चालू होते.
माेदींच्या कार्यात खारीचा वाटा
योगायोगाने मोदी यांचा शपथविधीचा दिवस आणि महंते यांचा वाढदिवस २६ मे राेजी आहे. वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात व्यग्र राहिल्याने महंते यांना स्वत:चा वाढदिवससुद्धा साजरा करता आला नाही. जन्मदिनाच्या या खास दिवशी घरच्यांना वेळ देता आला नाही. पण त्याची खंत महंते यांना वाटत नाही. मोदी यांचे काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मलाही खारीचा वाटा उचलता आला. हे सुख वाढदिवसापेक्षा मोठे असल्याचे ६१ वर्षांचे महंते सांगतात.

मोदीही "हमशकल'चे चाहते
दस्तूरखुद्द मोदीसुद्धा महंते यांना ओळखतात. २०१२ मध्ये गुजराच्या निडणुकांमध्ये महंते सक्रिय होते. उंबरगावमध्ये भाजप उमेदवार रमणभाई पाटकर यांच्या प्रचारात त्यांचा सहभाग होता. महंतेविषयी खुद्द मोदींनीच रमणभाईंकडे विचारणा केली आणि तेव्हाच मोदींना भेटण्याचा योग आला. ‘लोकसभा इलेक्शन तोंडावर आहेत. तुमची आम्हाला गरज लागेल,’ असे मोदींनी महंतेंना सांगितले हाेते. त्यानुसार महंतेंनी लाेकसभेला मुंबईत जोरदार प्रचार केला. अरुण जेटली यांच्या पंजाबातल्या अमृतसर मतदारसंघातही महंतेना प्रचारासाठी फिरवण्यात आले होते.

झडतीची हिंमत नाही झाली
मी जेव्हा गुजरात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मोदींना भेटायला गेलाे तेव्हा माझ्या सोबतच्या सर्वांची तपासणी झाली. माझी झडती घेण्याचे मात्र सुरक्षा रक्षकांना धाडस झाले नाही, असेही महंते सांगतात.

पोलादचे उद्योजक
मालाडचे विकास महंते पोलाद उद्योजक अाहेत. ते भाजपचे पाठीराखे आहेत. वसईत स्टीलचे त्यांचे अनेक कारखाने आहेत. ‘मोदींप्रमाणे दिसण्याचा मला काही लाभ नकोय. उलट मोदी जो समर्थ भारत घडवायला निघाले आहेत, त्यात माझेही योगदान असावे,’ इतकीच अपेक्षा महंते यांची आहे.

घराबाहेर पडणे मुश्कील झाले : आता मला हाॅटेलात जाता येत नाही. सार्वजनिक कार्यक्रमात कुठे गेलो तर लोक हस्तांदोलन करण्यासाठी गर्दी करतात. सेल्फीसाठी थांबवतात. त्यामुळे मी घराबाहेर टोपी घालूनच बाहेर पडतो, असे महंते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...