मुंबई -
आपल्या अनोख्या आवाजाने अनेक गीतांना अजरामर करणारे प्रख्यात गायक मोहंमद रफी यांचे पुत्र शाहिद रफी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुंबादेवी मतदारसंघातून एमआयएमच्या तिकिटावर शाहिद रफी लढत असून काँग्रेसच्या अमीन पटेल आणि भाजपच्या अतुल भातखळकर यांना ते टक्कर देण्याचा प्रयत्न करणार आहेत. राज्यात एमआयएम पावले रुजवण्याचा प्रयत्न करीत असून त्यासाठीच शाहिद रफी यांना मैदानात उतरवल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकीच्या मैदानात अनेकदा अभिनेते-अभिनेत्री उतरलेल्या दिसतात; परंतु यंदा मात्र अभिनेते-अभिनेत्री कुठेही दिसून आलेले नाहीत. मात्र, शाहिद रफी यांच्या उमेदवारीमुळे ग्लॅमरची ही जागा काही प्रमाणात भरून निघाल्याचे दिसून येत आहे. गायकीपासून दूर राहिलेल्या ५२ वर्षीय शाहिद रफी यांचा गोरेगाव येथे कपड्यांचा व्यवसाय असून मोहंमद रफी यांच्या नावाने त्यांनी एक अकॅडमी स्थापन करून तरुण गायक निर्माण करण्याचे काम सुरू केलेले आहे.
बाबांचा मला अाशीर्वाद
समाजासाठी काहीतरी करावे असे मला वाटत होते. त्यामुळेच एमआयएमतर्फे मला निवडणुकीबाबत विचारण्यात आले तेव्हा मी लगेचच तयार झालो. लोकांच्या मूलभूत समस्या जसे पाणी, शौचालय, जुन्या इमारती आहेत, या विषयांवर मी प्रचारात भर देणार आहे. या मतदारसंघातून शिवसेनेच्या युगंधरा साळेकर, मनसेचे इम्तियाज अनिस, राष्ट्रवादीचे हुजेफा इस्माईल इलेक्ट्रिकवाला मैदानात आहेत; पण माझ्या बाबांचा मला आशीर्वाद असल्याने मी येथून नक्कीच निवडून येईन.
- शाहिद रफी, मोहंमद रफी यांचे पुत्र व कापड व्यावसायिक