बेळगाव- सीमाप्रश्न हा ‘तुमचा’ प्रश्न आहे, तो तुम्हीच सोडवा असे वादग्रस्त विधान करून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ कलावंत मोहन जोशी यांनी बेळगावमधील मराठी सीमावासीयांच्या जखमेवर मीठच चोळले आहे. असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मोहन जोशींनी माफी मागावी अन्यथा 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान बेळगावात होणारे नियोजित नाट्य संमेलनात आम्हाला भरविणे शक्य होणार नाही अशी भूमिका नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेने गुरुवारी घेतली. दरम्यान, नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेने इशारा दिल्यानंतर व नाराजीनंतर मोहन जोशी यांनी सपशेल माघार घेत माफी मागितली आहे. माझ्या बोलण्याने जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असे म्हणत मोहन जोशींनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
बेळगाव नाट्य परिषदेच्या शाखेची अध्यक्षा वीणा लोकूरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. त्यात सर्वप्रथम मोहन जोशींच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. मोहन जोशींनी बुधवारी बेळगावच्या सीमाप्रश्नी एक वादग्रस्त केले होते. सीमाप्रश्न हा ‘तुमचा’ प्रश्न, तो तुमचे तुम्ही सोडवा! सीमाप्रश्नाचा ठराव मांडणार नाही. सीमाप्रश्नांवर चर्चा करीत बसणे हे माझे काम नाही. सीमाप्रश्न हा राजकीय प्रश्न आहे व नाट्यसंमेलनाचे व्यासपीठ हे कलावंतांचे आहे. त्यामुळे नाट्यसंमेलनात सीमाप्रश्नाबाबत ठराव-बिराव काही मांडणार नाही आणि ते माझे कामही नाही. राजकीय नेते त्यांच्या सभांत, कार्यक्रमात नाट्यक्षेत्रावर चर्चा करतात का? मग नाट्य संमेलन होत असताना अशी राजकीय भूमिका आम्ही का घ्यायची. हा राजकीय विषय असून, कलांवताने यात पडू नये, असे वादग्रस्त वक्तव्य मोहन जोशींनी केले होते.
जोशींच्या या वक्तव्यानंतर सीमा भागातील मराठी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जोशींच्या या वक्तव्यानंतर नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखा सदस्यांनी जोशींच्या वक्तव्याचा निषेध करीत राजीनामे दिले आहेत. सीमा प्रश्नाशी कळकळ नसलेल्यांसोबत काम करणे शक्य नाही अशी भूमिका नाट्य परिषदेच्या काही सदस्यांनी घेतली आहे.