आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना हा दलालांचा पक्ष अशी टीका करताच मोहन रावलेंची पक्षातून हकालपट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सध्याच्या शिवसेनेवर व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर पाच वेळा खासदार राहिलेल्या मोहन रावलेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. हा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. मोहन रावलेंनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा पक्ष व पक्षनेतृत्त्वावर तोफ डागली. तसेच शिवसेना हा दलालांचा पक्ष बनला असल्याची बोचरी टीका केली होती.
आज दुपारी रावलेंनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली. रावले म्हणाले, उद्धव ठाकरेंचे पीए नार्वेकर ते म्हणतील तेच आज पक्षात होत आहे. त्यामुळे खरे शिवसैनिक पक्षावर नाराज आहेत. मात्र, नार्वेकरांना दूर करण्याची हिम्मत उद्धव यांच्यात नाही. त्यामुळे पक्षाची वाट लागली आहे. शिवसेना पक्ष हा आता दलालांचा बनत चालला आहे. बाळासाहेबांच्या काळात असे नव्हते. ते सगळ्यांना विश्वासात घेत असत व समजावून सांगत. मात्र आता असे होत नाही. आता सेनेतील रिमोट कंट्रोल नार्वेकरांच्या हातात जात आहे. खरा अस्तनीतील निखारा हा नार्वेकरच आहे, असा आरोपही रावलेंनी केला.
बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षाचे नेतृत्त्व दुरावले असे सांगत, नार्वेकरांच्या हातात पक्ष गेला असल्याने मला पक्षातून काढून टाकल्याचे आश्चर्य वाटले नाही. तसेच नार्वेकरांबद्दल जाहीर बोलल्यानेच माझ्यावर कारवाई केली गेल्याचे रावलेंनी मत व्यक्त केले. सेनेत आपली घुसमट होत असून, पक्ष नेतृत्त्वाकडून दुय्यम स्थान मिळत असल्याने आपण नाराज आहोत. मला पक्षात सातत्याने डावलले जात आहे. गेली चार वर्षे मला उद्धव यांची भेट घेता आली नाही. कार्यक्रमात भेटतात मात्र वैयक्तिक भेट दिली नाही. यामागे कोण आहे, मला चार-चार वर्षे भेटता येत नाही ते केवळ मिलिंद नार्वेकर यांच्यामुळेच. माझ्या मतदारसंघातील आमदार, नगरसेवकांचे फोटो लावले जात आहेत. पण माझा फोटो सोडा साधे नाव ही टाकले जात नाही. बाळासाहेब मला समजून घ्यायचे. काहीही चूक केली तरी ते पदरात घालून घ्यायचे. काही बोलायचे, सल्ले द्यायचे पण त्यांनी टाकून दिले नाही की दूर केले नाही. मला पक्षाने दुय्यम स्थान दिले म्हणून वाईट वाटत नाही तर मला कोणी साधे आपुलकीनेही बोलतही नाही, असे रावलेंनी पुन्हा एकदा आरोप केले.

रावलेंना लोकसभेचे तिकिट मिळणार नसल्यानेच हल्लाबोल, वाचा पुढे.....