आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohan Rawale News In Marathi, Shiv Sena Supremo, Divya Marathi

शिवसेनेचा ‘अंगरक्षक’ बनला ‘राष्‍ट्रवादी’भक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एकेकाळी शिवसेनाप्रमुखांचे अंगरक्षक असलेले मोहन रावले यांना बाळासाहेबांच्या करिष्म्याने तब्बल पाच वेळा खासदारकी मिळाली. मात्र, शिवसेनाप्रमुखांच्या पश्चात त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत ‘राष्‍ट्रवादी’भक्त होण्यात धन्यता मानली. दरम्यानच्या काळात त्यांनी मनसे, समाजवादीशी घरोबा करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र राजकीय भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी रावलेंना ‘घड्याळा’चीच महती पटल्याचे दिसून आले.


शिवसेनेचा परळ, लालबाग, वरळी हा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यातूनच मोहन रावले यांनी काम सुरू केले. गिरणी कामगाराचा हा धाडसी मुलगा त्या काळी शिवसेनाप्रमुखांचा अंगरक्षक म्हणून काम करू लागला. सोबत महाविद्यालयीन शिक्षणही सुरू होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर त्याची आंदोलने पाहून बाळासाहेबांनी आपल्या अंगरक्षकालाच भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद बहाल केले. ही जबाबदारी त्यांनी उत्तमपणे सांभाळली, प्रसंगी रस्त्यावर उतरून मारामा-याही केल्या. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांनी रावले यांना महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक पद देऊन ‘बेस्ट’चे सदस्यपदही दिले.


एका सामान्य कार्यकर्त्याला मोठे करण्याएवढे बाळासाहेबांचे मन विशाल होते. या स्वभावानुसारच त्यांनी 1991 मध्ये सर्वप्रथम रावलेंना मुंबईतून लोकसभेचे तिकीट दिले. प्रचारासाठी स्वत: वरळीत सभा घेतली. शिवसेनाप्रमुखांचा उमेदवार म्हणून जनतेनेही रावलेंच्या पारड्यात भरभरून मते टाकली व त्यांना संसदेत पाठवले. बाळासाहेबांच्या कृपेने एक-दोनदा नव्हे, तर तब्बल पाच वेळा रावलेंना खासदारकी मिळाली.


नेतृत्वावर टीकेमुळे सेनेतून हकालपट्टी
2009 मध्ये मनसेमुळे मराठी मतांचे विभाजन झाले व काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांनी रावलेंचा पराभव केला. या पराभवानंतर मात्र त्यांचे ‘मातोश्री’वरील महत्त्व कमी झाले. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर मात्र रावलेंना व्यवस्थित दूर सारले. याच कारणावरून रावले उद्धव ठाकरेंवर नाराज होते. डिसेंबर महिन्यात त्यांनी उद्धव यांच्या नेतृत्वावर टीका केल्याने अखेर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.


भेटीगाठीनंतर राज ठाकरेंनी नाकारले
मोहन रावलेंनी घेतलेली राज ठाकरेंची भेट हेही त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी होण्यामागे एक कारण होते. मात्र, शिवसेनेने बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर मनसेनेही त्यांना जवळ केले नाही. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे रावलेंनी सुरुवातीला मनसे व नंतर समाजवादी पार्टीशीही जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुठेही त्यांची डाळ शिजली नाही. अखेर उमेदवारी नका का मिळेना, पण राजकीय भवितव्य तरी कायम राहील, या उद्देशाने रावलेंनी राष्‍ट्रवादीशी संधान साधले. नरसिंह राव सरकारला तारण्यास रावलेंनी मदत केल्याची आठवण कायम असल्यामुळे मग शरद पवारांनीही त्यांना आपल्या पंखाखाली घेतले.

हे खरे शिवसैनिक नाहीतच
शिवसेनेने अनेकांना आमदार, खासदार मंत्री बनवले. एकदा नव्हे तर अनेकदा संधी दिली. त्यामुळे आता नव्या चेह-यांना संधी देणे आवश्यक आहे. काही जुन्या नेत्यांना तर राष्‍ट्रपतिपदाचीही स्वप्ने पडत आहेत. मात्र हे चुकीचे आहे. केवळ पदांसाठी पक्ष सोडणारे खरे शिवसैनिक नाहीतच.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख


दहीवड्यामुळे ‘आजारी’
नरसिंह राव यांचे सरकार अल्पमतात आले असताना अविश्वासदर्शक ठरावाच्या मतदानाच्या वेळी रावले शरद पवारांच्या सांगण्यावरून संसदेत गैरहजर राहिले व राव सरकार तरले. त्या वेळी रावलेंनी दहीवडा खाल्ल्याने आजारी पडल्याचे कारण सांगितले होते. मात्र, खरे कारण बाळासाहेबांपासून लपून थोडेच राहणार होते. त्यामुळेच ‘बॅगा उचलून हात दुखले असतील तुमचे’ हा टोला त्यांनी रावलेंना लगावला होता. एवढ्यावरही बाळासाहेबांनी मोठ्या मनाने माफ करून रावलेंना पुन्हा एकदा संसदेत पाठवले.


शिवसेनेचा गड सोडलेले मावळे
छगन भुजबळ - शरद पवारांसोबत प्रथम काँग्रेस आणि आता राष्ट्रवादीत. बांधकाममंत्री आणि आता नाशिकमधून उमेदवार.
गणेश नाईक- युतीच्या सरकारच्या काळातच शिवसेना सोडली. आता राष्‍ट्रवादीचे मंत्री.
नारायण राणे- काँग्रेसमध्ये प्रवेश. उद्योगमंत्री, मुलगा नितेश खासदार.
भास्कर जाधव- राष्ट्रवादीत प्रवेश. माजी मंत्री आणि सध्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष.
आनंद परांजपे - (कल्याणचे खासदार) राष्ट्रवादीत प्रवेश. कल्याणमधून उमेदवारी.
भाऊसाहेब वाकचौरे - (शिर्डीचे खासदार) काँग्रेसमध्ये प्रवेश. शिर्डीतून उमेदवारी.
गणेश दुधगावकर - (परभणी खासदार) राष्ट्रवादीत प्रवेश.
गजानन बाबर - (मावळचे मावळते खासदार) अजून कोणत्याही पक्षात नाहीत.
अभिजित पानसे- शिवसेना चित्रपट शाखा प्रमुख. मनसेत प्रवेश. ठाण्यातून उमेदवारी.