आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohan Rawale's Travelling From Shiv Sena Chief Bodygurd To MP

मोहन रावले यांचा शिवसेनाप्रमुखांचा अंगरक्षक ते खासदार पर्यंतचा प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मोहन रावले यांचा शिवसेनेतील प्रवास हा सामान्य शिवसैनिक ते पाच वेळा खासदार असा दीर्घकाळाचा ठरला. तरुणवयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंगरक्षकाची महत्त्वाची जबाबदारी रावले यांनी सांभाळली. अंगरक्षक म्हणून संधी मिळाल्यानंतर ते बाळासाहेब यांच्या विश्वासातील बनले. परळ भागातील हा तरुण अंगरक्षक म्हणून काम करत असताना महाविद्यालयीन शिक्षणही घेत होता. महाविद्यालयीन तरुणांचे प्रश्न सोडवण्यात पुढाकार घेणा-या रावलेंची ही हुशारी पाहून त्यांच्यावर भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि ती त्यांनी अतिशय मेहनतीने सांभाळली.
गिरणी कामगाराचा मुलगा असलेल्या व गिरण्यांच्या परिसरात लहानाचा मोठा झालेल्या रावले यांच्यात शिवसेना स्टाइल राडेबाजी नसानसात होती. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये विरोधी विद्यार्थी संघटनांना अंगावर घेताना किंवा गिरणी परिसरात विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना आवाज देताना रावले कधी मागे राहिले नाहीत. यामुळे त्यांच्या छाती ते पोटापर्यंत तलवारींनी वार केल्याची मोठी खूण दिसते. ही खूण ते अभिमानाने मिरवतातही.
गिरणी कामगारांचा बालेकिल्ला असलेल्या लालबाग, परळमध्ये रुजलेल्या शिवसेनेच्या ताकदीचा पुढच्या काळात रावले यांना इतका फायदा झाला की ते तब्बल पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले. मात्र, मनसेच्या उदयानंतर दक्षिण मुंबईतील शिवसेनेचा बुरूज कोसळला आणि सहाव्यांदा खासदार होण्याचे रावले यांचे स्वप्न भंग पावले. ते 1999 च्या लोकसभा निवडणुकीत तिस-या क्रमांकावर फेकले गेले. मनसेच्या बाळा नांदगावकरांनी दुस-याक्रमांकाची मते घेऊन रावलेंच्या राजकीय कारकीर्दीला चाप लावला. नरसिंह राव यांचे केंद्रातील अल्पमतात गेलेले सरकार वाचवण्यात मोहन रावले यांची अनुपस्थिती कारणीभूत ठरल्यानंतर त्यांच्याविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, दहीवडा खाऊन पोट बिघडल्याने आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावे लागले, असा खुलासा रावले यांना करावा लागला. पण त्यानंतर मोहन रावले गेले कुणीकडे, असे उपहासाने बोलणे त्यांना सहन करण्याची वेळ आली.
रावलेंकडून विद्यार्थी सेना राज यांच्याकडे
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची धुरा घेतली ती रावलेंकडूनच. अख्खी विद्यार्थी सेना घडवून त्यांनी ती तयार अवस्थेत राज यांच्याकडे दिली. भारतीय विद्यार्थी सेनेची प्रभावी कामगिरी करताना त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणूनही संधी मिळाली आणि बेस्ट समितीवर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1991 मध्ये त्या वेळच्या दक्षिण मध्य मुंबईतून खासदार म्हणून ते निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही.