आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेजेत रुग्णांना जेवण, औषधी, कॅन्सर पेशंटसाठी टॉय बँक; तीन दशकांपासून सेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - परळच्या टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या आवारात पहाटेपासून रात्रीपर्यंत सहकाऱ्यांसह धडपडणारा माणूस दिसेल. गेल्या तीन दशकांपासून रुग्णांच्या सेवेची त्याची ही धावपळ सुरू आहे. हरकचंद सावला हे त्यांचे नाव, वय ५८ वर्षे. वयाच्या २८ व्या वर्षी रुग्णांच्या सेवेचा वसा त्यांनी घेतला. त्यांचा हा जीवनज्योत यज्ञ टाटा, जेजे, कामा, सेंट जाॅर्ज अशा प्रमुख चार रुग्णालयांत अव्याहत सुरू आहे. यात रोज ७०० लोकांना दोन वेळचे जेवण दिले जाते. शिवाय औषधी बँक, सिक बेड सर्व्हिस, कॅन्सरग्रस्त मुलांना टाॅय बँक, तसेच सहलींचे आयोजन, कृत्रिम हातपाय बसवून देण्याची सेवा जीवनज्योत पुरवते.

टाटाजवळच्या कोंडाजी चाळीत तीन दशकांपूर्वी रोज २५ रुग्णांच्या नातलगांना जेवण पुरवणे सुरू केले. आता जेजेत १५ वर्षांपासून, जाॅर्जमध्ये ४, तर कामामध्ये वर्षभरापासून दोन वेळचे जेवण पुरवले जाते. सुरुवातीची १२ वर्षे सावलांनी जवळचे सर्व पैसे खर्चून अन्नदान सुरू ठेवले. पुढे जीवनज्योत ही संस्था काढली.
रस्त्यावर जेवण बनवणाऱ्या पेशंटच्या १०० नातेवाईकांना महिन्यातून दोनदा शिधाही दिला जातो.
हरकचंद सावला यांचे ध्येयवेड

खर्च ३ कोटी, जमा होतात १ कोटी!
जेवण, िशधा, औषधे, एमआरआय, सीटी स्कॅन, रेिडएशन व इतर सेवेसाठी महिना १० लाख खर्च येतो. वर्षाला १ कोटी जमतात, पण उभारलेल्या सर्व कामांसाठी ३ कोटींची गरज आहे. दानशूर व्यक्तींची मदत अपुरी पडते, असे सांगून. इच्छुकांनी ९८६९०६४००० क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सावला यांनी केले आहे.

सेवाश्रम, गोशाळेचे स्वप्न
परराज्यातून मायलेकी आल्या होत्या. १९८४ मध्ये. टाटात महागडे उपचार असल्याचे सांगून त्यांना सायन रुग्णालयात पाठवले गेले. परळमध्ये राहत असूनही टाटात मोफत उपचार होतात याची माहिती सावलांना नव्हती. परराज्यातील लोकांचे काय हाल होत असतील या विचाराने त्यांनी रुग्णसेवेचे काम सुरू केले. शेवटच्या स्टेजला असलेल्या रुग्णांच्या सेवेसाठी सेवाश्रम, वृद्धाश्रम आणि गोशाळा उभारण्याचा सावला यांचा संकल्प आहे. मागील पाच वर्षांपासून सरकारकडे त्यासाठी जागा मागत आहोत. डोंबिवली-कल्याणजवळ शिळफाटा येथे जागाही उपलब्ध आहे, असे सावला सांगतात.