आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदी महिनापूर्ती, शेतमाल बाजार कोसळलेलाच, डाळिंबाच्या दरात ३० टक्के घसरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई :नोटाबंदीच्या निर्णयास महिना उलटला असला तरी आशिया खंडात सर्वाधिक मोठी उलाढाल असलेल्या नवी मुंबईच्या वाशी बाजारपेठेतील मंदी कायम आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने आवक वाढली आहे. त्यात नोटाबंदीमुळे किरकोळ व्यापाऱ्यांनी खरेदी कमी केल्याने शेतमालाचे तिपटीने घसरले आहे.
परिणामी भाजीपाल्याचा वाहतूक खर्चही निघत नसून फळांच्या किमती ३० टक्क्यांनी घसरल्या असून महिना उलटूनही मंदी हटलेली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने अतिस्वस्ताईमुळे सामान्य नोकरदार वा अन्य शहरी ग्राहकांना आनंद होत असला तरी शेतकऱ्यांचे मात्र कंबरडे मोडत आहे.

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज सुमारे ७०० ते ८०० ट्रक मालाची आवक होते. नोटाबंदीनंतर शेतमालाची आवक काही घटलेली नाही. किरकोळ व्यापारी, फेरीवाल्यांना रोकड टंचाई जाणवत आहे. त्यामुळे त्यांनी खरेदी बंद केल्याने मालाला उठाव नाही. परिणामी भाजीपाल्याच्या किमती तिपटीने खाली घसरल्या आहेत, अशी माहिती शरद कापसे या भाजी मार्केटमधील व्यापाऱ्याने दिली.
“कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला दुपारी १२ पर्यंत विकला जातो. मात्र, आता संध्याकाळ झाली तरी तो तसाच पडून राहतो. शेतीतून मुंबईपर्यंत फुलकोबीची एक गोणी पोहोचायला मजुरी व वाहतूक मिळून किमान १०० रुपये खर्च येतो. यात उत्पादन खर्चाचा समावेश नाही. मात्र, सध्या केवळ ५० रुपयांत गोणीभर फुलकोबी विकण्यासाठीही महत्प्रयास करावे लागत आहेत.
शेतमाल तोडून तो बाजारापर्यंत पोहोचवणे परवडत नसल्याने अनेक शेतकरी ते शेतातच नष्ट करण्याला पसंती देत आहेत,’’ असे शेतकरी बबनराव घाटे यांनी सांगितले. फळांचा ग्राहक हा श्रीमंत व मध्यमवर्गीय असतो. या वर्गाने फळांची खरेदी कमी केली आहे. त्यामुळे द्राक्षे, डाळिंब, अंजीर, सफरचंद अशा महागड्या फळांना उठाव नसल्याने फळांच्या किमती ३० टक्क्यांनी घसरल्या आहेत. याचा फटका मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील बागायतदार शेतकऱ्यांना बसतो आहे, असे एन. डी. पानसरे अँड सन्सचे संजय पानसरे यांनी सांगितले.
अडत्यांचे फावले, शेतकरी अडचणीत
- आडत्यांना उधारीवर माल विकावा लागतो आहे. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांकडे महिनाभरात एका एका आडत्यांचे ३०-४० लाख अडकले आहेत. यात काही आडते बुडण्याची शक्यता आहे.
- बाजार समित्यांत माल पाठवणारा शेतकरी व खरेदीदार किरकोळ व्यापारी कॅशलेस व्यवहाराचे ज्ञान नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात बाजार समित्यांचे व्यवहार कॅशलेस करण्याची केलेली घोषणा या समित्यांमध्ये वास्तवात उतरवणे अशक्य असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
- वाशी बाजारपेठेतील १५ टक्के माल मुंबईतल्या माँल्सना जातो. माँल्समध्ये कॅशलेस व्यवहार होतात. नोटाबंदी माँल्सना उपकारकच ठरली असली तरी शेतकरी आणि ७० टक्के खरेदीदार फेरीवाल्यांना मात्र नोटाबंदीचा फटका बसल्याचे आडते असोसिएशनकडून सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...