मुंबई - ‘काँग्रेस उमेदवारांनी प्रचारात सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात प्रचार साहित्याबरोबरच पार्टी फंडही उमेदवारांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे अनेक उमेदवारांनी प्रचार मध्येच सोडून दिला होता,’ असा गौप्यस्फोट करत काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी
आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला. उमेदवारांना पार्टी फंड पोहोचवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांनी पार्टी फंड न मिळाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्याची माहिती आपण अहवालात नमूद करणार असल्याचे सांगत राणे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा टार्गेट केले आहे.
काँग्रेसची पार्टी फंडाची दहा कोटींची रक्कम चोरीला गेल्याच्या बातम्या आहेत. मात्र, पक्षाने पोलिसांत तक्रार दिलेली नाही. १० कोटींची रक्कम निवडणुकांसंदर्भात फारच अल्प आहे. तेवढ्याने निवडणुकांचे काम काही थांबत नसते, अशी पुस्तीही राणे यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात जोडली.
काँग्रेसच्या पराभवास अनेक कारणे आहेत. मात्र, आघाडी तुटली त्या वेळेसच आमचा पराभव स्पष्ट झाला होता. काँग्रेस उमेदवारांनी निवडणुकीपूर्वी हार मानली होती. मात्र, प्रचार यंत्रणेचा प्रमुख या नात्याने पराभवाची नैतिक जबाबदारी आपण स्वीकारल्याचे राणे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची भाषा चुकीची
देवेंद्र फडणवीस आता अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री असताना वेगळ्या विदर्भाची भाषा करणे चुकीचे आहे, असे मत राणे यांनी व्यक्त केले.
कारभार काँग्रेससारखाच
निवडणुकीपूर्वी भाजपने जनतेला वारेमाप आश्वासने दिली आहेत. ती पूर्ण करण्यास नव्या सरकारमधील खडसे वगळता एकही मंत्री उपयोगाचा नाही. नव्या सरकारची कार्यपद्धती काँग्रेससारखीच असेल. प्रत्येक निर्णयाला त्यांना मोदी-शहा यांच्या मान्यतेची वाट पाहावी लागणार आहे, त्यामुळे प्रशासनाचे बारा वाजणार, असे वक्तव्य करून राणेंनी भाजपसोबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनाही टोला लगावला.
एकही पसंत नाही : पक्षाचा विधिमंडळ नेता निवडीचा अधिकार हायकमांडचा आहे. मात्र, सध्या जी नावे चर्चेत आहेत, त्यातील कोणासही विधिमंडळ नेता म्हणून निवडू नये, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे राणे यांनी सांगितले.
धक्के देतच राहणार : मी सध्या विधानसभेत नाही. परिषदेतही नाही आहे. मात्र,मी काही राजकारणातून निवृत्त झालेलो नाही. माझ्या स्वभावाप्रमाणे मी राज्यातील फडणवीस सरकारला धक्के देतच राहणार, असे राणे यांनी सांगितले.
गुरुवारी नेता निवड : विधिमंडळातील नेत्यांची निवड करण्यासाठी काँग्रेसच्या सर्व आमदारांची गुरुवारी (६) दुपारी विधान भवनावर बैठक बोलावली आहे. बैठकीला केंद्रीय निरीक्षक म्हणून लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खारगे उपस्थित राहणार आहेत.