आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर: आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आमदार मोनिका राजळेंना राज्यमंत्रिपद?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार मोनिका राजळे यांना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देण्याबाबत भाजपमध्ये जोरदार खल सुरू असल्याची माहिती मिळत आहे. - Divya Marathi
आमदार मोनिका राजळे यांना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देण्याबाबत भाजपमध्ये जोरदार खल सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
पाथर्डी- विधानसभेच्या नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात जिल्ह्याला राज्यमंत्रिपद वाट्याला येऊन आमदार मोनिका राजळे यांचे नाव पक्षीय पातळीवर अग्रक्रमांकावर असल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ राजकीय सूत्रांकडून मिळत आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनीही याबाबत सूचक मौन बाळगले आहे.   
 
माजी आमदार स्व. राजीव राजळे यांनी पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात पक्ष बांधणीसाठी विशेष प्रयत्न करत पाथर्डी तालुक्यात पंचायत समिती, तालुका खरेदी विक्री संघ, नगरपालिका, वृद्धेश्वर कारखाना अशा विविध ठिकाणी पक्षाला यश मिळवून दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती. जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या वजनदार घराणे म्हणून राजळे कुटुंबीयांकडे पाहिले जाते. नगर दक्षिणेत भाजप पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी राजळेंचा मंत्रिमंडळात समावेश करून सहकार चळवळीवरही पकड ठेवण्यासाठी राजळेंच्या राजकीय वर्तुळाचा फायदा पक्षाला होऊ शकतो. 
 
आमदार बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख अशा दिग्गज नेत्यांचे नातेसंबंध राजळे कुटुंबाशी आहेत. राजळेंच्या ताब्यातील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना गडाख कुटुंबाच्या देखरेखीखाली वाटचाल करणार अाहे. आमदार मोनिका राजळे यांचे हस्ते गाळप हंगाम सुरू करून त्यांना सक्रिय करण्याच्या प्रयत्नाचे त्यांच्या समर्थकांनी जोरदार स्वागत केले आहे. पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, पालिकेचे उपनगराध्यक्ष बजरंग घोडके आदी कार्यकर्त्यांसह विविध गावांच्या कार्यकर्त्यांनी मोनिका राजळेंच्या नेतृत्वाला नव्याने झळाळी देण्यासाठी ठिकठिकाणी लावलेले फ्लेक्सबोर्ड लक्ष वेधून घेत असून तो चर्चेचा विषय ठरला आहे.
 
 राजळे यांच्या निधनानंतर आमदार मोनिका राजळे यांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह विविध पक्षांतील आमदार, खासदार, आजी-माजी मंत्री, राज्यातील सर्व पक्षीय नेते यांनी धाव घेत राजळे कुटुंबाचे सांत्वन केले होते. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी, तर दोन दिवस सलग राजळेंकडे आल्या. तालुक्याला सुद्धा स्व. राजळे यांनी गेल्या १५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत राज्यभर केलेली नेतृत्वाची पेरणी पहायला मिळाली. राजीव यांच्या निधनानंतर मोनिका यांच्या नावाच्या मंत्रिपदासाठी गांभीर्याने विचार सुरू झाला. 
 
उत्तम संवाद संघटन कौशल्य, सासर-माहेरचा राजकीय वारसा विविध संस्थांच्या कामकाजांची माहिती स्वच्छ प्रतिमा सकारात्मक कार्यपद्धतीमुळे आमदार राजळे पक्षात अजातशत्रू म्हणून ओळखल्या जातात. मंत्रिमंडळात भाजपला महिलांचा टक्का वाढवायचा आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने व्यूहनितीचा भाग म्हणून भाजपकडून राजळेंना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. 
 
मुंडेंची नाराजी रोखण्यासाठी राजळेंना मंत्रिपद-
 
ग्रामविकासमंत्रीपंकजा मुंडे यांचे खाते बदल झाल्यास त्यांची नाराजी रोखण्यासाठी सुध्दा मोनिका यांच्या मंत्रिपदाचा वापर करता येईल, असे डावपेच आखले जात आहेत. आमदार राजळे या पंकजा मुंडे गटाच्या समजल्या जातात. सांत्वनासाठी आलेल्या पंकजा यांनी शोकाकूल अवस्थेत असलेल्या आमदार राजळेंच्या कानात काहीतरी 'गुप्तवार्ता' सांगून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. या कान गोष्टींचा संबंध मंत्रिपदाशी जोडला जात आहे. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित आणखी माहिती....
बातम्या आणखी आहेत...