आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अखेर मान्सून केरळात; महाराष्ट्रात लवकरच, वादळासह पावसाने यूपीत‍17 ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थिरुवनंतपुरम/भोपाळ/जयपूर/नवी दिल्ली/पुणे- प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नैऋत्य मान्सून बुधवारी केरळ किनारपट्टीवर धडकला. केरळमधील मान्सूनच्या आगमनाबरोबरच देशात अधिकृतरीत्या पावसाळा सुरू झाला आहे. मान्सूनची आगेकूच होण्यासाठी एकूणच परिस्थिती अनुकूल असून येत्या चार- पाच दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून इडुक्की जिल्ह्यात भूस्खलन होऊन एक जण ठार झाला.

दुसरीकडे, हवामान विभागाने (आयएमडी) दिलेली माहिती अशी की, मान्सून 15 जूनपर्यंत देश सर्वत्र सक्रीय होईल. दरम्यान मध्यप्रदेशात मात्र, 20 जूनपर्यंत मान्सूनची प्रतिक्षा करावी लागणार आहे. वादळासहसह पाऊस व वीज कोसळून उत्तर प्रदेशात 17 ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.
नैऋत्य मान्सूनचे केरळ आणि लक्षद्वीपमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान खात्याच्या तिरुवनंतपुरम प्रादेशिक केंद्राचे प्रमुख के. संतोष यांनी केली. केरळबरोबरच तामिळनाडूचा बहुतांश भाग, कर्नाटकचा दक्षिण भाग आणि बंगालच्या खाडीच्या उर्वरित भागाच्या दिशेने मान्सूनची आगेकूच सुरू आहे. या वर्षी सात दिवस उशिराने मान्सूनचे आगमन झाले आहे. सर्वसाधारणपणे १ जून रोजी मान्सूनचे केरळ किनारपट्टीवर आगमन होत असते. मंगळवारी रात्रीपासूनच केरळच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. यापूर्वी ९ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले होते.

मंगळवारी रात्रीपासूनच केरळच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असल्याने इडुक्की जिल्ह्यात भूस्खलन होऊन जोबी जॉन यांचा मृत्यू झाला, तर त्यांची आई गंभीर जखमी झाली. गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत केरळच्या किनारपट्टीपासून खोल समुद्रात आणि लक्षद्वीपच्या नैऋत्येला ताशी ४५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा हा वेग ताशी ६० किलोमीटरपर्यंतही जाऊ शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. वाऱ्याचा हा वेग मान्सूनच्या महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच होण्यासाठी पोषक आहे.

दरवर्षी एक ते तीन जून दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होतो. यंदा तो वेळेपर्वीच येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार अंदमान समुद्रात मान्सूनचे आगमन १८ मे रोजीच झाले होते. दरवर्षी मान्सून अंदमान समुद्रात २० मे च्या सुमारास येतो. यंदा तो दोन दिवस आधीच दाखल झाल्याने दुष्काळग्रस्त नागरीक ‘पाऊस लवकर येणार’ या अपेक्षेने आनंदले होते. मात्र २१ मे पासून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या रोअनु चक्रीवादळाने मान्सून अंदमानातच खोळंबून राहिला. चक्रीवादळाने सगळे बाष्पयुक्त वारे आकर्षून घेतल्याने त्याचे केरळमधील आगमन लांबले.

पश्चिम भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस
हवामान खात्याने यंदा दीर्घावधी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. २ जून रोजी जाहीर पूर्वानुमानानुसार देशात १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. दक्षिण द्वीपकल्पाचा भाग व मध्य भारतात अतिवृष्टी (११३ टक्के), उत्तर- पूर्व भागात सरासरीपेक्षा कमी (९४ टक्के) तर उत्तर-पश्चिम भागात सरासरीपेक्षा जास्त (१०८ टक्के) पावसाचा अंदाज आहे.

उर्वरित भागात वेळे आधीच पोहोचणार
केरळमध्ये मान्सूनचे उशिराने आगमन झाले असले तरी मध्य व पूर्व भारतात तो वेळेच्या आधी पोहोचण्याची शक्यता आहे. देशभरात जुलैमध्ये मान्सूनचा पाऊस दीर्घावधी सरासरीच्या १०७ टक्के, तर ऑगस्टमध्ये १०४ टक्के होण्याची शक्यता आहे.

अशी हाेते अधिकृत घाेषणा :
मान्सूनचे आगमन झाल्याची अधिकृत घोषणा करण्यासाठी हवामान खात्याचे तीन महत्त्वाचे निकष आहेत. १० मेपासून हवामान खात्याने निरीक्षण सुरू केले होते. हे तीनही निकष बुधवारी पूर्ण झाले.
१. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याच्या घोषणेसाठी १४ केंद्रांवर पाऊस होणे आवश्यक असते. गेल्या ४८ तासांत सर्व केंद्रांवर आणि ७ व ८ जून रोजी ६० टक्के केंद्रांवर पावसाची नोंद झाली.
२.दक्षिण अरबी समुद्रावर पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी ३०-४० किलोमीटर आवश्यक असतो. ६०० हेक्टोपास्कल दाबाने वाऱ्याच्या या वेगाची नोंद झाली.
३.इन्सॅट ३डी उपग्रहद्वारे प्राप्त दीर्घ तरंग विकिरण मूल्य २०० डब्ल्यू प्रति वर्गमीटर आवश्यक असते. ८ जून रोजी त्याची नोंद झाली.

राज्यात दमदार बरसणार
केरळात मान्सून पूर्ण भरात आहे. तीन-चार दिवसांत महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल होईल, असे वातावरण आहे. अनुकूल परिस्थिती, कमी दाबाच्या पट्ट्यांची निर्मिती, बाष्पाचे प्रमाण यावर पुढची वाटचाल राहील. ४८ तासांत वाऱ्यांचा वेग, दिशा व तीव्रता कायम राहिल्यास राज्यात मान्सून दमदार सलामी देईल,असे आयएमडी संचालक डॉ. सुनीता देवी यांनी सांगितले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, केरळमध्ये दाखल झालेल्या मान्‍सूनचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...