आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monsoon News In Marathi, Mumbai, Konkan, Divya Marathi

मुंबई, कोकणात दमदार पाऊस; 24 तासांत मराठवाड्यासह राज्यभर पडणार पाऊस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ पुणे - गेल्या दोन- तीन दिवसांपासून मुंबई व कोकणावर मेहेरबान झालेल्या वरुणराजाची ‘आभाळमाया’ मंगळवारी दिवसभरही या भागावर कायम होती. सकाळपासूनच सुरू झालेल्या दमदार पावसाने या भागाला अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीवरही परिणाम झाला होता. अरबी समुद्राला उधाण आल्याने मुंबईकरांनी पाऊस व लाटांमध्ये भिजण्याचा आनंद लुटला.

कोकण, गोवा, विदर्भातील काही ठिकाणी, पश्चिम महाराष्ट्रासह घाटमाथ्यावर मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याचे वृत्त हवामानशास्त्र विभागाने दिले आहे. मात्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणे वगळता पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र होते. बंगालच्या उपसागरात ओडिशा-छत्तीसगड किना-यालगतचे कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यास आगामी 24 तासांत मराठवाड्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असाही हवामान खात्याचा अंदाज आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या तुडुंब
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 418 मि. मी. पाऊस झाला असून गगनबावडा येथे 148 मि. मी. नोंद झाली आहे. एक जूनपासून जिल्ह्यात 3568 मि. मी. पाऊस झाला. आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडीत जोरदार पाऊस सुरू असून पंचगंगा नदीलाही मोठे पाणी आले आहे. त्यामुळे उघड्यावर पडलेली अनेक मंदिरे पुन्हा पाण्याखाली गेली आहेत.जिल्ह्यातील 7 कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यांवर पाणी आल्याने तेथील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या पावसाने शेतक-यांसह शहरातील नागरिकांनाही दिलासा मिळाला असून त्यामुळे किमान नदीकाठच्या गावांच्या पाण्याचे येणारे संभाव्य संकट टळले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकही टँकर सुरू नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोयना धरणातील जलसाठा वाढला
सातारा जिल्ह्यातील कोयना पाणलोट भागात गेल्या 24 तासांत समाधनकारक पाऊस झाला. या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन तो 15 टीएमसीपर्यंत पोहोचला आहे.
कोयना, नवजा, महाबळेश्वर या भागात गेल्या 24 तासांत सुमारे 126 मि.मी.पावसाची नोंद झाली. मंगळवारी दिवसभरात सुमारे 80 मि.मी. पाऊस झाला. पाणलोट भागात झालेल्या पावसाने कोयना धरणात 10 हजार 90 क्युसेक्स पाणी जमा झाले. महाबळेश्वर येथेही संततधार पाऊस सुरू आहे.

सातारा, वाई, फलटण, माण, खटाव तालुक्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी दिवसभरात टप्प्याटप्याने पडल्या. अजूनही या भागात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. जिल्ह्याच्या पूर्वेस दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.दरम्यान, मे महिन्यात झालेल्या गारपिटीची नुकसान भरपाईपोटी जिल्हयातील 60 हजार 958 शेतक-यांना 5 कोटी 40 लाख रुपये मदतीचे वाटप करण्यात आले आहे.