आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी अधिवेशन: विरोधी आमदार आक्रमक; आगीची ‘धग’ विधानसभेत !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मंत्रालयाच्या आगीचे पडसाद सोमवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत उमटले. सर्व कामकाज बाजूला ठेवून विरोधी पक्षांनी या विषयावर चर्चेची मागणी करत घोषणाबाजी केली. त्यामुळे दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आले.
विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी सुरुवातीलाच मंत्रालयातील आगीबाबत स्थगन प्रस्ताव मांडण्याची विनंती केली. आग ही लागली होती की लावली होती, असा संशय लोकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यावर आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांनीही नियम 57 आणि 97 मध्ये हा प्रस्ताव बसत असल्याचे सांगत सरकारने या विषयावर चर्चा न केल्यास सत्य परिस्थिती लपवली जात आहे, असे वाटू शकते, त्यामुळे चर्चा व्हायलाच हवी, अशी मागणी केली.
‘मुख्यमंत्री तोंड उघडा’- वळसे-पाटील म्हणाले की, नियम 57 अन्वये कामकाज पत्रिकेतल्या कामाला प्रधान्य दिले जाते तर नियम 97 अद्याप लागू होत नाही. त्यामुळे 57 अन्वये मांडण्यात आलेला चर्चेचा हा प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावला आणि प्रश्नोत्तरे पुकारली. त्यामुळे नाराज झालेल्या विरोधी आमदारांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. 'मंत्रालयाला लागली आग, भ्रष्टाचाराच्या फाइल्स खाक', 'मुख्यमंत्री तोंड उघडा' अशा घोषणा देत भाजपचे देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, योगेश सागर तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे, वसंत गिते वेलमध्ये उतरले. या गोंधळामध्ये अध्यक्षांनी कामकाज प्रश्नोत्तराचा तास संपेपर्यंत 45 मिनिटे तहकूब केले.
दुपारी 12 वाजता पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली असता विरोधकांनी पुन्हा घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर शोकप्रस्ताव पुकारण्यात आले. माजी विधानसभा सदस्य शांताराम घोलप, गोवर्धन खोटरे आणि गोविंदराव डक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विरोधकांनी शांततेत शोकप्रस्ताव मांडून सरकारला सहकार्य दिले. मात्र पुन्हा गोंधळ सुरू झाला. दरम्यानच्या काळात तीन अध्यादेश आणि पुरवणी मागण्या सभागृहामध्ये मांडण्यात आल्या. त्यानंतर विरोधकांना 97 अन्वये सूचना मांडण्यास सांगण्यात आले. खडसे यांनी पुन्हा आगीच्याच विषयावर बोलायला सुरुवात केली. देसाई यांनीही आग लावली गेली का, असा संशय व्यक्त होत असल्याचे सांगितले. गणपतराव देशमुख यांनी या विषयावरची चर्चा नाकारली तर जनतेवर अन्याय होईल, असे सांगितले तर मनसेचे बाळा नांदगावकर यांनी काही मंत्र्यांकडे संशयाची सुई असल्याचे सांगितले.
आज होणार चर्चा - मुख्यमंत्र्यांनीही चर्चेची तयारी दाखवली. आतापर्यंत सरकारने केलेल्या उपाययोजना, गुन्हे शाखेचा तपास यावर उत्तर द्यायला सरकार तयार असल्याचे सांगितले. तसेच उद्याही चर्चा चालेल, असे सुचवले. त्यावर वळसे-पाटील यांनी 15 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करून सर्व गटनेत्यांची बैठक घेऊन या विषयावर नियम 97 अन्वये मंगळवारी दुपारी चर्चा होईल, असे त्यांनी जाहीर केले व सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.
सरकारविरोधात विरोधकांची प्रथमच एकजूट- पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्रितपणे आक्रमक होऊन संघर्ष करण्याची रणनीती आखली आहे. पहिल्या दिवसाचे कामकाज झाल्यानंतर सोमवारी विरोधकांनी बैठक घेऊन व्यूहरचना केली. मनसेही पहिल्यांदाच या बैठकीत सहभागी झाली होती.
पहिल्याच दिवशी विरोधकांनी मंत्रालयातील आगीच्या चौकशीची मागणी करीत आपले मनसुबे स्पष्ट केले. सरकारने ही चर्चा उद्या घेण्याची तयारी दाखवत वेळ मारून नेली असली तरी विरोधकांनी मात्र यापुढे आक्रमक पवित्रा घ्यायचे ठरवले आहे. त्यासाठी शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयात विरोधी पक्षाच्या आमदारांची विरोधी पक्षनेत्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला शिवसेना, भाजपसह मनसेच्याही आमदारांनी उपस्थिती लावली होती. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी वेगवेगळे लढण्याऐवजी एकत्रित लढून सरकारला प्रत्येक विषयावर घेरण्याची व्यूहरचना केली असल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते विनोद तावडे यांनी दिली.
आमदारांचे अभ्यासगट- या अधिवेशनात विषयांना प्राधान्य द्यायचे ठरले असून काही विषयांवर बोलण्यासाठी आमदारांचे अभ्यासगट तयार केले जाणार असल्याचे शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांनी सांगितले.