आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी अधिवेशन आजपासून: अकार्यक्षम सरकारचा पर्दाफाश करणार- एकनाथ खडसे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आयोजिलेल्या चहापानाला हजेरी लावण्याचा निर्णय घेतला असला तरी या अधिवेशनात सरकारच्या अकार्यक्षमतेचा आणि भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार असल्याचे विरोधकांनी रविवारी स्पष्ट केले. विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरून अडचणीत आणणार असल्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सोमवारपासून प्रारंभ होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला रविवारी एकनाथ खडसे यांच्या शासकीय निवासस्थानात झालेल्या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षांतील सर्व गटनेत्यांनी हजेरी लावली होती.
मंत्रालयात लागलेल्या आगीमुळे राज्य सरकारची प्रतिमा धुळीस मिळाली असून या आगीत पाच जणांचा मृत्यू होऊनही अद्याप गुन्हा नोंद न झाल्याबाबत विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. ही आग लागली होती की घातपात होता, याविषयी शंका व्यक्त करून सरकारच्या अकार्यक्षमतेचा नमुना यामुळे पाहायला मिळाल्याचे खडसे यांनी सांगितले.
सिंचन श्वेतपत्रिकेचे काय झाले?- राज्यात अजूनही दुष्काळी परिस्थिती असून पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. मात्र या टंचाईच्या नावाखाली सरकारने अर्थसंकल्पात तरतूद नसतानाही तीनशे कोटी रुपयांचा आकस्मिक निधी दुष्काळासाठी दिला आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत दीडशे कोटीसुद्धा नसतील तर हे राज्याला शोभणारे नसल्याचे खडसे यांनी सांगितले. सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. त्यानंतर सिंचन खात्याने केलेल्या सादरीकरणाने त्यांचे समाधान झाले असले तरी राज्यातील जनतेला सिंचनाची श्वेतपत्रिका मिळाली पाहिजे. जलसंपदामंत्री सुनील तटकरे आणि कृपाशंकरसिंहांच्या भ्रष्टाचाराला सरकार पाठीशी घालत असले तरी सभागृहात त्याचा जाब विचारू, असेही खडसे यांनी या वेळी सांगितले.
कर्नाटकचा निषेध करा : देसाई- राज्यातील आंबा उत्पादक शेतकºयांना नुकसान भरपाईचे आश्वासन गेल्या अधिवेशनात सरकारने दिले होते. मात्र ते अद्यापही पूर्ण झाले नाही. याबाबत सरकारला धारेवर धरले जाईल. मुंबईतील म्हाडाच्या धोरणाबाबत आणि पुनर्वसनाबाबत कोणतीही भूमिका सरकारने घेतलेली नाही. विरोधी पक्ष म्हणून याबाबत जोरदारपणे आपली बाजू मांडू, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सांगितले. तर महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नात राज्य सरकारने आपली भूमिका ठासून मांडली पाहिजे, न्यायालयाच्या ताशेºयांनंतरही बेळगाव महाापालिका पुन्हा बरखास्त करणाºया कर्नाटक सरकारचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निषेध करावा. गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न, मुंबईच्या आमदारांची बैठक घेऊनही मुंबईतील प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांनी या वेळी केला.
मनसे विचारणार भ्रूणहत्येचा जाब- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, राज्यातील स्त्री भ्रूणह्त्येच्या प्रश्नावर सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत जाब विचारणार असून टोलनाक्यांवर सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत, रस्ते अपघातांबाबतच्या मुद्द्यांवर सभागृहात चर्चा उपस्थित केली जाईल. अधिवेशन चार आठवड्यांचे करावे, या मागण्यांची सरकारला जाणीव करून देण्यासाठी सरकारने आयोजिलेल्या चहापानाला हजेरी लावण्याचा निर्णय विरोधकांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात 25 हजार कोटींचा भूखंड घोटाळा : सोमय्या
हिंमत दाखवा, श्वेतपत्रिका काढाच : मुंडे
श्वेतपत्रिका काढा, भ्रष्टाचाराचे पुरावे मी देतो : अण्णा हजारे
जलसिंचनाची श्वेतपत्रिका सादर करा : मुख्यमंत्री