आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'उद्धव हमारे साथ है, ये अंदरकी बात है\'- जितेंद्र आव्हाडांच्या घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशीही विरोधकांनी शेतक-यांना कर्जमाफी देण्यावरून जोरदार आंदोलन केले. शेतक-यांना कर्जमाफी दिल्याशिवाय अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही. आज तत्काळ शेतक-यांच्या प्रश्नांवर व कर्जावर विधीमंडळात चर्चा घडवून आणावी अशी मागणी करीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यावर घोषणाबाजी करीत जोरदार आंदोलन केले. त्यानंतर विधानसभेतील वेलमध्ये उतरून विरोधक आमदारांनी गदारोळ केला. विरोधकांच्या गदारोळातच प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनाबाहेर सरकारविरोधात घोषणा दिल्या. तसेच 'उद्धव हमारे साथ है, ये अंदरकी बात है' अशा घोषणा दिल्या. भाजपच्या मंत्र्याविरोधात विरोधकांकडे पुरावे असल्यास त्यांना साथ देऊ असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. सत्तेत असलेला शिवसेना भाजपची जिरवण्यासाठि विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळाल्याची चर्चा या निमित्ताने जोरदार रंगली आहे. दरम्यान, आव्हाडांच्या घोषणा व उद्धव यांचे वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सरकार शेतक-यांच्या कर्जमाफीबाबत चर्चा करायला तयार आहे. विरोधकांनी याचे राजकारण करू नये. विरोधी आमदार हसत-खेळत आंदोलन करीत आहेत. त्यामुळे त्यांना शेतक-यांचा खरंच कळवळा आहे का? असा सवाल कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधकांना केला आहे.
आज सकाळी 11 वाजता विधीमंडळाचे कामकाज सुरु होताच विरोधक आमदारांनी शेतक-यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित पाय-यांवरच आंदोलन सुरु केले. त्यावेळी फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. भाजपा-शिवसेना सरकारकडे जनतेच्या कल्याणासाठी कोणतेही ठोस धोरण नाही. भ्रष्टाचार, बोगस पदवी प्रकरणे आणि परस्परांतील वादांत हे सरकार अडकले असून या सरकारची सध्याची अवस्था नाचता येईना, अंगण वाकडे, अशी झाली आहे, अशी टीका विरोधकांनी केली.
भाजपा-सेनेचे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेताना बहिरेपणाची भूमिका घेत आहे. दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी राजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी, त्याचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी या शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी देण्याची गरज आहे. हे सरकार जोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करीत नाही, तोपर्यंत सदनाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशाराही काँग्रेस-राष्ट्रवादीने दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...