पुणे- कोकणासह मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, लोणावळा व मुळशी परिसरात गुरुवारी रात्री पावसाने हजेरी लावली. दरम्यान, हा वाळव्याचा पाऊस असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. असे असले तरी केरळमध्ये मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, कोकण किनारपट्टीवरही लवकरच त्याचा प्रभाव दिसून येईल असेही हवामान खात्याचे म्हणणे आहे. दरम्यान, मुंबईसह रायगड, उरण व कोकणातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने मान्सूनचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
गेल्या तीन-चार दिवसापासून पुण्यात उकाडा वाढला होता. त्यामुळे पुणेकर उकाड्याने हैराण होते. मात्र, गुरूवारी रात्री दोननंतर आभाळ अचानक ढगाने गच्च भरले. त्यानंतर रिमझिम पण शांत पाऊस पडत राहिला. सकाळपर्यंत हा पाऊस पडत होता. यामुळे परिसरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून पुण्यात सकाळी 8 पर्यंत 12 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली होती. सोलापूर व नगर जिल्ह्यातही ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
केरळमध्येच अद्याप मान्सून आला नसल्याने हवामान खात्याचे तज्ज्ञ या पावसाला मान्सूनचा पाऊस मानायला तयार नाहीत. मात्र, मान्सूनच्या काळात जसे सर्वत्र आभाळात ढग जमा होतात तसेच सर्वत्र ढग जमा झाले आहेत. हे वातावरण मान्सूनसाठी अतिशय पोषक बनले आहे. केरळमध्ये आज मान्सून दाखल होत आहे असे हवामान खात्याने म्हटले आहे.
मान्सूनचाच पाऊस?-
कोकण किनारपट्टी, मुंबई, पुणे, कोल्हापूर व मावळ-मुळशीसह सह्याद्रीच्या रांगेत जेव्हा एकाच वेळी पाऊस पडतो तो वाळवाचा पाऊस असू शकत नाही असे ज्येष्ठ नागरिक व शेतक-यांचे म्हणणे आहे. हा मान्सूनचाच पाऊस असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, हवामान खाते मात्र हे मानायला तयार नाही. केरळातच मान्सून हजर झाला नसताना हा मान्सूनचा पाऊस हे म्हणणे घाईचे ठरेल. शिवाय पाऊस अगदीच कमी पडला आहे. फक्त वातावरणात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.