आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More Than Two Dozens Police Officer Of Mumbai Connected With Dawood Ibrahim

मुंबई पोलिस दलातील 18-20 अधिका-यांचे दाऊदशी संबंध- छोटा राजनचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मला मुंबईत नाही तर दिल्लीत हालवा अशी विनंती करणारा अंडरवर्ल्ड छोटा राजनने दावा केला की, मुंबई पोलिस दलातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी दाऊदसाठी काम करतात. सुमारे दीड डझन म्हणजे 18 ते 20 असे पोलिस अधिकारी सध्या मुंबई पोलिस दलात आहेत जे दाऊदशी संबंधित आहेत. त्या सर्वांची नावेही छोटा राजनने सीबीआयकडे दिली असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. गेल्या आठवड्यात छोटा राजनने बालीत असताना मुंबई पोलिस दलातील काही अधिकारी दाऊदचे काम करतात असा जाहीर आरोप केला होता. तसेच मुंबईत माझ्या जीवाला धोका बनू शकतो त्यामुळे इतरत्र ठेवावे असे त्याने सीबीआयच्या पथकाला सांगितले होते.
सीबीआय व मुंबई पोलिस दलाचे 55 जणांचे पथक छोटा राजनला एका चॉर्टर्ट विमानाने इंडोनेशियातील बालीतून आज पहाटे नवी दिल्लीत दाखल झाले. सध्या राजन दिल्लीतील सीबीआयच्या मुख्यालयात अटकेत आहे. यापूर्वी सांगितले गेले होते की, राजनला थेट मुंबईत आणले जाईल व मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. मात्र, राजनने मुंबई पोलिसांबाबत गौप्यस्फोट केल्यानंतर सीबीआय व भारतीय गुप्तचर संघटनांनी राजनच्या जीवाला मुंबईत धोका पोहचेल या शक्यतेने तूर्ततरी दिल्लीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलिस दलात दाऊदशी संबंधित अनेक पोलिस अधिकारी आहेत. राजनच्या छोट्या-मोठ्या हालचाली त्यांच्यामार्फत दाऊद व त्याच्या हस्तकांपर्यंत जावू शकतात या भीतीने सीबीआयने राजनला दिल्लीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई व महाराष्ट्रात राजनवर जे 76 प्रकारचे विविध गुन्हे, खटले आहेत ते सर्व खटले सीबीआयकडे गुरुवारीच वर्ग करण्यात आले आहेत. याचाच अर्थ राजन प्रकरणातील कोणतेही माहिती दाऊदपर्यंत जाऊ नये यासाठीच खबरदारी घेतली आहे. छोटा राजनवर असलेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलिसांकडे न ठेवता तो थेट सीबीआयकडे राहील.
छोटा राजनचा राजकीय वापर शक्य-
छोटा राजन आजपर्यंत एक अंडरवर्ल्ड डॉन म्हणून कुप्रसिद्ध होता. आता मात्र तो भारताच्या ताब्यात आला आहे. भारतात येताच छोटा राजनने भारत मातेला वंदन केले. भारत माझी जन्मभूमी आहे. 23 वर्षानंतर भारतात आल्याचा मला आनंद आहे. दहशतवादाविरोधात मी गेली अनेक वर्षे लढत आहे. दाऊदला मी घाबरत नाही. त्याच्याविरोधात व दहशतवादाविरोधात माझा लढा कायम चालू राहील अशी वक्तव्ये राजनने केली आहे. याचाच अर्थ तो दाऊद व त्याच्या दुश्मनीला धार्मिक व राष्ट्रीय रंग देऊ पाहत आहे. हिंदू दलित असलेल्या राजनचे भारतीय गुप्तचर संघटनांशी गेली अनेक वर्षे सलोख्याचे संबंध असल्याचे सांगितले जाते. बॅंकाकमध्ये झालेला हल्ला असो की जून महिन्यात छोटा शकीलने राजनवर ऑस्ट्रेलियात केलेल्या हल्ल्याची तयारी असो या घटनांतून राजनला सहीसलामत वाचविण्यात भारतीय गुप्तचर यंत्रणांचाच हात होता अशी माहिती पुढे आली आहे.
आताही तो वाढत्या वयामुळे व दाऊदच्या भीतीने शरण आल्याचे बोलले जात आहे. केंद्रात व राज्यात सध्या भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. उजव्या विचारसरणीची ही सरकारे छोटा राजनचा दाऊदविरोधातील मोहरा म्हणून वापरू शकतात. दाऊदच्या मुसक्या आवळण्याचा मनसुभा मोदी सरकारचा आहे. तसे केल्यास सरकारबाबत देशात चांगला संदेश जाईल व त्याचा राजकीय फायदा होऊ शकतो. छोटा राजनला हाताशी धरून दाऊदशी संबंधित मुंबईसह देशातील बेनामी संपत्तीची माहिती मिळवून त्या सील केल्या जाऊ शकतात. दाऊदचा दुबई, सिंगापूर, मलेशिया आदी देशासह काही आखाती देशात मोठी मालमत्ता व संपत्ती आहे. एका माहितीनुसार दाऊदकडे सध्या 44 हजार कोटी रूपयांची संपत्ती आहे. त्यावर टाच आणून दाऊदचे साम्राज्य नष्ट केले जाऊ शकते. दाऊद देशद्रोही आहे त्याने मुंबईत बॉम्बस्फोट घडविले आहेत. शेकडो लोक त्याने मारले आहेत. त्यामुळे त्याच्याविषयी देशातील जनतेतील चीड आहे. याचाच फायदा घेऊन येथील सत्ताधारी राजनचा राजकीय वापर करू शकतात. दाऊद व राजनच्या दुश्मनीला हिंदू विरूद्ध मुस्लिम असाही रंग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.