आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री-जान्हवीचा प्रेक्षकांना बाय-बाय, शेवटचा भाग २३ जानेवारीला, सिक्वल येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या अडीच वर्षांपासून घराघरांत पोहोचलेल्या व तमाम महिला वर्गाच्या गळ्यातील ताईत बनलेल्या श्री- जान्हवीच्या जोडीची "होणार सून मी या घरची' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. श्री आणि जान्हवी यांना कन्यारत्न झाल्याचे दाखवल्यानंतर या मालिकेचा शेवट होणार असून २३ जानेवारीला याचा अखेरचा भाग दाखवण्यात येणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा होती. तसेच जान्हवीला बाळ कधी होणार, असा प्रश्न राज्यातील घराघरांत विचारला जात होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर चाहत्यांना लवकरच मिळणार आहे. मालिकेच्या शेवटी जान्हवीला मुलगी होणार आहे. मुलीच्या बारशाचा समारंभ करून या मालिकेचा शेवट गोड होईल.
मालिकेतील प्रेम रिअल लाइफमध्ये
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मने जिंकली. श्री म्हणजेच शशांक केतकर आणि जान्हवी अर्थातच तेजश्री प्रधान यांचे मालिकेच्या सेटवर फुललेले प्रेम आयुष्याच्या पटलावरही बहरले. या दोघांनी मालिकेच्या यशस्वितेनंतर विवाह उरकला. त्यानंतर दोघे विभक्त होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, मालिकेतील घडामोडी प्रत्यक्ष आयुष्यात उतरवून मालिकेचा ग्राफ उंचावण्याचा तो प्रयत्न होता, हे आता सिद्ध झाले.
काहीही हं श्री
श्री आणि जान्हवी जोडीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मालिकेतील रटाळपणामुळे ती बंद करण्याची मागणी होऊ लागली होती. तसेच जान्हवीच्या "काहीही हं श्री' आणि गरोदरपणावर छोट्यांपासून राजकीय मंडळीपर्यंत चर्चा होती. एका कार्यक्रमात तर एका माजी उपमुख्यमंत्र्याने विरोधकांवर टीका करताना जान्हवीच्या डिलिव्हरीबाबत मुद्दा उपस्थित केला होता. दरम्यान, ही मालिका आता संपत असली तरी भविष्यात या मालिकेचा सिक्वल प्रेक्षकांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.