आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुव्यवस्थेचे धिंडवडे : फरार कैद्यांना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातूनच मदत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून सोमवारी मध्यरात्री पाच कुख्यात कैदी पळून गेल्याप्रकरणी कारागृह अधीक्षक वैभव कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाच्या महासंचालकांकडून त्यांची चौकशी केली जाईल. त्यात कांबळे किंवा इतर कोणीही दोषी आढळले तर त्यांना पोलिस सेवेतून काढून टाकले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. या कैद्यांना पळून जाण्यासाठी कारागृहातूनच मदत झाली, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
फरार कैद्यांच्या निमित्ताने आक्रमक झालेल्या विरोधकांनी या विषयावर केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. अधीक्षक कांबळे यांच्याविरोधात गेल्या वर्षी वेगवेगळ्या स्वरूपांचे ५१ अहवाल आले होते, पण आधीच्या आघाडी सरकारने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

२३ फूट लांब आणि २३ फूट उंच अशा बराकीतून खिडकीचे गज वाकवून हे कैदी पळाले. त्यामुळे त्यांना अंतर्गत मदत मिळाली असण्याची शक्यता जास्त आहे. मोबाइल वापरला जातो म्हणून कारागृहात जॅमर बसवण्यात आले. पण हे जॅमरही जाणीवपूर्वक बंद करण्यात येत असल्याचे आढळून आल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली. कारागृह अधीक्षकांची चौकशी करणाऱ्या समितीकडून कारागृहांमधील त्रुटीही शोधण्यात येणार आहेत. ही समिती एप्रिलअखेरपर्यंत अहवाल देण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल. त्यांना सेवेतून तर काढलेच जाईल, पण त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हेही दाखल केले जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
नगरचा मुद्दाही गाजला

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांची नागपूर आणि राजेगाव (जि. नगर) येथील सामूहिक बलत्कार प्रकरणी २८९ अन्वये चर्चेची मागणी होती. ती सभापतींनी फेटाळली. त्यामुळे विरोधकांनी प्रचंड गोंधळ झाला. यामुळे सभागृह सलग पाच वेळा तहकूब करावे लागले.
शेवटी सरकारने चर्चेची तयारी दाखवताच नियम ९७ अन्वये सर्व कामकाज बाजूल सारून अल्पकालीन चर्चा घेण्यात आली. त्यात धनंजय मुंडे यांच्यासह माणिकराव ठाकरे, नीलम गोऱ्हे, प्रकाश गजभिये, अशोक जगताप, विद्या चव्हाण, हरिभाऊ राठोड, हेमंत टकले आदींनी या चर्चेत भाग घेतला.
डान्स पडला महागात

मुंबईतील ना. म. जोशी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मोरे यांना डान्स बारमध्ये गेल्याबद्दल निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात दोषी आढळल्यास त्यांनाही पोलिस सेवेतून काढून टाकले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
तुमची कर्तबगारी पाहिली

भाषणात वारंवार व्यत्यय आणणाऱ्या विरोधकांच्या वर्मावरच मुख्यमंत्र्यांनी घाव घातला. ‘आमची चार महिन्यांतील कर्तबगारी सांगता. तुमची १५ वर्षांची ‘कर्तबगारी’ पाहिली आहे. तेव्हाची बिघडलेली कायदा व सुव्यवस्था दुरुस्त करण्यासाठी जरा वेळ लागेल. गेल्या सरकारमध्ये काय झाले ते मी सांगणार नाही. पण परिस्थिती सुधारण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे,’ असे फडणवीस म्हणाले.
कुख्यात गुन्हेगारांचा आढावा घेणे बंदच

नागपूरमध्ये झालेल्या गोळीबारातील आरोपी लिटील सरदार आणि जेंटील सरदार यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. जेंटील सरदारला ‘एमपीडीए’ या प्रतिबंधात्मक कायद्याखाली अटक करण्यात आली होती. पण आधीच्या सरकारने शासन स्तरावर घेतलेल्या आढाव्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. गुन्हेगारांना जरब बसावी म्हणून यापुढे कोणत्याही प्रकरणाचा आढावा घेताना गृहमंत्र्यांसह सर्वांसाठी निकष निश्चित केले जातील. गंभीर पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांचा आढावा घेण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आरोपी राष्ट्रवादीचे : नगर जिल्ह्यातील राजेगाव येथे महिलेवर सामूहिक अत्याचाराची घटना आजी-माजी सरपंचांमधील वैमनस्यातून घडली आहे. हे दोन्ही भाजपचे नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत. मात्र, कोणताही पक्ष कोणालाही असे गुन्हे करा म्हणून सांगत नाही, अशी कोपरखळीही मुख्यमंत्र्यांनी मारली.
अखेर पानसरेंची आठवण : सोमवारी झालेल्या कायदा व सुव्यवस्थेवरील चर्चेत मुख्यमंत्र्यांनी कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा उल्लेख टाळल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली होती. त्याची आठवण करून देत पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाची सर्व माहिती मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात दिली.
कुख्यात कैदी नेपाळमध्ये पळून गेल्याचा संशय?
नागपूरच्या तुरुंगाची सुरक्षा भेदून पाच कैदी फरार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी तुरुंग विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर शहरात दाखल झाल्या. त्यांनी तब्बल सहा तास कारागृह प्रशासनाची झाडाझडती घेतली. दरम्यान, हे कैदी नेपाळमध्ये पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्या दृष्टीनेही एक पथक तिकडे रवाना झाले आहे.
सोमवारच्या रात्री दोनच्या सुमारास पाच कुख्यात कैदी बराकीच्या खिडकीचा गज वाकवून आणि २५ फूट उंच सुरक्षा भिंत पार करुन पसार झाले. या घटनेमुळे राज्यातील पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली.
पुणे, बुलडाणा आणि नाशिक येथून विशेष पथक नागपुरात दाखल झाले आहेत. ते तुरुंगाची पाहणी करीत आहेत. मीरा बोरवणकर यांनी बुधवारी सकाळी पोलिस जिमखाना येथे नागपूरचे पोलिस आयुक्त के. के. पाठक आणि उपायुक्तांची भेट घेतली. पोलिस विभागाशी झालेल्या बैठकीत फरार आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी सहकार्याची मागणी केली. दुपारी चारच्या सुमारास त्या कारागृहात गेल्या. फरार आरोपींची बराक आणि पळून गेलेल्या ठिकाणाची त्यांनी पाहणी केली. बोरवणकर तीन दिवस नागपुरात असून या प्रकरणाच्या तपासावर व्यक्तिश: नजर ठेवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.