आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातृदिन विशेष: मुलाच्या शिक्षणासाठी परिश्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वयाच्या १९ व्या वर्षी वैधव्य आलेली आणि तिसरी उत्तीर्ण तरुणी आपल्या सहा महिन्यांच्या मुलाला जगवण्यासाठी काबाडकष्ट उपसते.. खडतर परिस्थितीवर मात करून आपल्या मुलाला पोलिस अधिकारी करते...स्वाभिमानाशी तडजोड न करता संघर्ष केल्यानंतरही त्या काळात साथ न देणा-या नातेवाइकांनाही उदार मनाने मदत करते.. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही कथा आहे देवकीबाई डोईफोडे या कर्तृत्ववान मातेची...
“लग्न झालं तेव्हा माझं वय अवघं १७-१८ वर्षांचं आणि वर्ष असेल ६०-६१. मी मालक (पती) खंडेराव यांच्याबरोबर मुंबईला आले. आमच्या मालकाचं दादरला चपलांचं दुकान होतं. सहा महिन्यांच्या पोराला मागं ठेवून मालक आम्हाला सोडून गेले तेव्हा मी १९ वर्षांची होते. त्यांना कॅन्सर झाला होता. शिक्षण नाही की कोणतीही कला नाही. सहा महिन्यांच्या बाळाला वाढवायचं होतं. या विषण्ण अवस्थेत सातारा जिल्ह्यातील लोणंदला जाणा-या एसटीमध्ये बसले. छोटंसं गाठोड घेऊन गावातल्या आमच्या घरात जाऊन राहिले. गावकीच्या मदतीने शिलाई मशीन घेतली आणि घरातच छोटी-मोठी कामं सुरू केली. उत्पन्न कमी, कष्ट खूप, पण स्वप्न मात्र एक होतं, रवीला शिकवायचं आणि मोठं करायचं. रवीला शाळेत घातलं. त्याला वाढवत असताना मी लहानाची मोठी कधी झाले तेच कळलं नाही. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे मला ठाऊक होते. म्हणून मी रवीच्या शिक्षणावर बारीक लक्ष ठेवलं. ब-याच वेळा पैसे न भरल्यामुळे त्याला शाळा सोडायची वेळ आली होती. मी शिलाई कामात पैसे मिळत
नव्हते म्हणून कापसाच्या कामाला जाऊ लागले, तर रवी रस्त्यावर उभा राहून चप्पल विकायचा. असे करत करत आमचा संसार सुरू होता. आज रवींद्र ठाण्यामध्ये क्राइम ब्रँचचा वरिष्ठ अधिकारी आहे,” राष्ट्रपतीपदक विजेत्या मुलाच्या फोटोकडे पाहत देवकीबाई सांगत होत्या.

आपल्या मालकाने हौसेने केलेले दागिने आणि मुंबईतील स्वत:चे दुकान यासाठी वादविवाद न करता किंवा कौटुंबिक तंटा न वाढवता अगदी सहजपणे त्या सर्वांवर पाणी सोडून मुलाला गावी घेऊन जाणारी आणि पुढे त्याच गावाचं ५ वर्षे सरपंचपद भूषवणारी देवकीबाई यांनी गावाचे रूपही पालटले आणि या गावाला निर्मल ग्राम पुरस्कारही मिळाला.
बातम्या आणखी आहेत...