आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मदात्या आईकडूनच मुलांची हत्या; ठाणे, पुण्यातील वेगवेगळ्या घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत चैतन्य - Divya Marathi
मृत चैतन्य
ठाणे- जन्मदात्या आईनेच मुलांची हत्या केल्याच्या दोन थरारक घटना ठाणे व पुण्यात उघडकीस आल्या आहेत. अमली पदार्थांच्या आहारी जाऊन पैशांसाठी मारझोड करणाऱ्या मुलाचा आईने गळा घोटला, तर दुसऱ्या घटनेत वडिलांकडे जाण्याचा हट्ट करणाऱ्या मुलाला घटस्फोटाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आईने मारले.

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील प्रिया चौधरी यांचा २० वर्षीय मुलगा अशोक हा अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. या व्यसनाची गरज पूर्ण करण्यासाठी तो सातत्याने आपल्या आईकडे पैशांची मागणी करायचा. बुधवारीही त्याने एक हजार रुपयांची मागणी केली होती, मात्र आईने त्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या अशोकने चक्क आईवरच हात उगारला. मुलाने अक्षरश: पट्ट्याने बेदम मारहाण केल्यामुळे प्रिया यांचाही पार चढला. दररोजच्या या कटकटीला त्या प्रचंड वैतागल्या होत्या. गुरुवारी दुपारी अशोक घरात झोपला असता प्रियाने संगणकाच्या वायरने त्याचा गळा आवळला, त्यात अशोक जागीच गतप्राण झाला. याप्रकरणी पोलिसांनी प्रियाला अटक केली आहे.

वडिलांकडे जाण्याचा हट्ट जिवावर बेतला - पुण्याची घटना

पती-पत्नीमध्ये घटस्फोटावरून सुरू असलेल्या वादात महिलेने आपल्या १३ वर्षीय मुलाची डोक्यात बॅट घालून हत्या केल्याची घटना पुण्यातील टिंगरेनगर येथे गुरुवारी घडली. आरोपी राखी बालपांडे हिला अटक करण्यात आली आहे.

राखी वाकडेवाडीतील कंपनीत नोकरी करते, तर तिचा पती नागपूरला असतो. घटस्फोटासाठी राखीने न्यायालयात अर्ज केलेला आहे. या दांपत्याचा मुलगा चैतन्य आईसोबतच पुण्यात राहत होता. गेल्या काही दिवसांपासून चैतन्य वडिलांकडे जाण्याचा हट्ट करत होता. यामुळे चिडलेल्या राखीने चैतन्यच्या डोक्यात बॅटने प्रहार केले. घाव इतका जबरदस्त होता की त्यामुळे चैतन्यचा मृत्यू झाला. दरम्यान, डॉक्टरांच्या अहवालानुसार, चैतन्यच्या शरीरावर विविध ठिकाणी फ्रॅक्चर होऊन रक्तस्राव झाल्याचे म्हटले आहे. तसेच डोक्यात बॅट मारल्यानंतर राखीने त्याचा गळा दाबल्याचेही उघड झाले आहे.