आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिव आरोग्य बाईक ॲम्ब्युलन्स सेवेचा मुंबईत लवकरच शुभारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वाहतूक कोंडीमुळे गरजू रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी आरोग्य विभागामार्फत शिव आरोग्य बाईक ॲम्ब्युलन्स सेवा मुंबईमध्ये लवकरच सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना या बाईक ॲम्ब्युलन्सचे सादरीकरण दाखवले. ही सेवा मुंबईसारख्या वाहतुकीची वर्दळ असणाऱ्या ठिकाणी उपयुक्त ठरेल, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
आरोग्यमंत्री म्हणाले की, यासेवेसाठी सध्या 10 बाईक ॲम्ब्युलन्स मुंबईसाठी उपलब्ध होणार आहेत. या सर्व ॲम्ब्युलन्स अद्ययावत साधनसामुग्रीने सज्ज असणार आहेत. सध्या ही सेवा 108 या क्रमांकाशी जोडली जाणार आहे. वाहतुक कोंडी आणि गर्दीच्या ठिकाणी अपघातग्रस्त अथवा एखाद्या आपत्तीत जखमी झालेल्या रुग्णाला गोल्डन अवर पेक्षा प्लॅटीनम मिनीटस् वेळेत उपचार मिळण्यासाठी ही बाईक ॲम्ब्युलन्स सेवा उपयुक्त ठरणार आहे.
या बाईक ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन पुरवठा यंत्र, पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर, बंद पडलेले हृदयाचे ठोके कार्यान्वित करणारी यंत्रणा, नेब्युलायजर, आपत्कालीन औषधी बॅग, विविध प्रकारची औषधे अशा सुमारे 15 ते 20 अत्याधुनिक साधनसामुग्रीचा समावेश असणार आहे. यामुळे रुग्णाला तातडीने उपचार करून जवळच्या रुग्णालयात दाखल करणे शक्य होणार आहे त्यामुळे रुग्णाला जीवदान देण्याकामी ही सेवा लाभदायक ठरणार असल्याचेही डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
या बाईक ॲम्ब्युलन्सची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही सुचना केल्या आहेत. त्यानंतर आवश्यक ते बदल करून लवकरच मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
शिव आरोग्य बाईक ॲम्ब्युलन्स सेवेचे महत्त्वाचे फायदे...
- वाहतूक कोंडीमुळे गरजू रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळणार
- रुग्णाला गोल्डन अवर पेक्षा प्लॅटीनम मिनीटस् वेळेत उपचार
- मुंबईसाठी 10 बाईक ॲम्ब्युलन्स उपलब्ध होणार
बातम्या आणखी आहेत...