आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP Ganesh Singh Creating A Ruckus In Siddhivinayak Temple

सिद्धिविनायक मंदिरात भाजप खासदाराचा गोंधळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या खासदाराने नववर्षाच्या पहाटे आक्षेपार्ह अवस्थेत सिद्धिविनायक मंदिरात घातलेल्या गोंधळाबद्दल तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

मध्य प्रदेशातील सतनाचे खासदार आणि भाजप कार्यकारिणीचे सचिव गणेश सिंह यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री सिद्धिविनायक मंदिर बंद झाले असतानाही आपल्या पदाचा गैरवापर करून मंदिर उघडण्यासाठी व्यवस्थापनावर दबाव आणला. सदरहू घटनेच्या वेळी गणेश सिंह यांनी मद्यप्राशन केलेले होते, अशी माहिती मिळाली असून, मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काबुक्की झाल्याचे वृत्त आहे.या मंदिरात कायम गर्दी असते व खरी श्रद्धा असलेले अमिताभ बच्चनसारखे अनेक व्हीआयपी पायी येऊन दर्शन घेतात. मात्र, आजवर कोणत्याही व्हीआयपीने बंद झालेले मंदिर उघडण्यासाठी गोंधळ घातला नव्हता, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच या प्रकरणामध्ये अद्याप गुन्हे दाखल झालेले नाहीत. या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी पोलिसांनी भाजपचे खासदार गणेश सिंह यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करून चौकशी सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. सिद्धीविनायक मंदिराच्या बाहेरच्या परिसरात सुरक्षेच्या अनुषंगाने पोलिसांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांमध्ये सदरहू घटनेचे चित्रिकरण झाले असून, त्याची चित्रफित आपण माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत मागणार असल्याचे ही सावंत यांनी सांगितले.