आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mp Hussain Dalwai Delegation Meet Cm Today At Mumbai

नितीन आगे, मोहसीन हत्याप्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी- हुसेन दलवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पुणे येथील आयटी इंजिनिअर मोहसीन शेख आणि जामखेडमधील दलित तरूण नितीन आगेच्या हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे देऊन राज्य सरकारने दोषींवर तातडीने कारवाई करून शिक्षा करावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांनीही कारवाईचे आश्वासन दिले आहे. या दोन्ही घटनांबाबत सरकार गंभीर असून, संबंधित घटनांचा तपास सुरु केला असून ज्या संघटना आणि व्यक्ती जाणिवपूर्वक धार्मिक तेढ वाढविण्याचे काम करीत आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत कडक शिक्षा मिळेल हे पाहिले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
काँग्रेसचे खासदार व मूळचे समाजवादी असलेल्या दलवाई यांनी जामखेडमधील खर्डा ते पुणे असा नुकताच लाँग मार्च काढला होता. खर्डातील दलित तरूण नितीन आगेची दोन महिन्यापूर्वी हत्या करण्यात आली होती. तसेच मागील महिन्यात पुण्यात हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोहसीन शेख या मुस्लिम तरूणाची हत्या करण्यात आली होती. याबाबत अजून म्हणावी तशी कारवाई झाली नाही. त्यामुळे काही संस्था, संघटनांनी नुकताच खर्डा ते पुणे असा लाँग मार्च काढला होता. यात काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई सहभागी झाले होते. या दोन्ही हत्यांकाडांचा तपास अतिशय संथ गतीने सुरु असून, त्यात अनेक त्रुटी असल्याचे दिसून येत आहे. याचमुळे खासदार हुसेन दलवाई यांनी पुण्यात लाँग मार्च काढल्यानंतर आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली.
दलवाईंच्या शिष्टमंडळात आमदार मोहन जोशी, शमा दलवाई, सुशिला मोराळे, शैला सातपुते, बाबूराव बनसोडे, ॲड विरेंद्र नेवे, निलेश घाग, खातून शेख, संध्या म्हात्रे आदींचा समावेश होता. आज दुपारी दलवाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी नितीन आगेचे आई-वडिलही उपस्थित होते.
नितीन आगे आणि मोहसीन शेख या तरूणांच्या हत्त्येप्रकरणी तातडीने संबंधित खुन्यावर कारवाई व्हावी, या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करावा अशी मागणी खासदार दलवाई यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे लावून धरली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या गंभीर घटनेबाबत सरकारने तातडीने कार्यवाही सुरु केली असून ज्या संघटना आणि व्यक्ती जाणिवपूर्वक धार्मिक तेढ वाढविण्याचे काम करीत आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत योग्य ती शिक्षा मिळेल हे पाहिले जाईल असे आश्वासन दिले.
मोहसीन शेख कुटुंबियांना यापूर्वीच आपण पाच लाखाची मदत केली असून गृह विभागाला सांगून या घटनेसंदर्भात अधिक काटेकोर तपास करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जामखेड येथील खर्डा येथे नितीन आगे या मुलाचा खून झाला होता. आगे कुटुंबीय मजुरी करून जीवन जगत असून त्यांना आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. त्याचप्रमाणे त्यांच्या उपजिवीकेचा प्रश्न सुटावा अशी विनंतीही या शिष्टमंडळाने केली. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.
छायाचित्र- खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन आगे, शेख हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा अशी मागणी केली आहे.