आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mp Mandlik Son Sanjay Joins In Shivsena, May Contest Loksabha From Kholapur

संजय मंडलिकांचा सेनेत प्रवेश, कोल्हापूरात महाडिकांविरोधात दंड थोपटणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कोल्हापूरचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव प्रा. संजय मंडलिक यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांच्यासह विजय देवणे उपस्थित होते. संजय मंडलिक आता शिवसेनेच्या तिकीटावर कोल्हापूरातून लोकसभेची निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे सदाशिवराव मंडलिकांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विरोधात दंड थोपटल्याचे दिसून येत आहे. आता या रोमहर्षक लढतीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे. कारण येथे राष्ट्रवादी विरूद्ध सर्वपक्षीय लढत पाहायला मिळणार आहे.
आज दुपारी 1 वाजता संजय मंडलिक यांचे मातोश्रीवर आगमन झाले. त्याआधी राजू शेट्टींनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कोल्हापूर लोकसभेची जागा महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेली आहे. या जागेवरून लढण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक इच्छुक आहेत. मात्र, ते काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे सेनेने त्यांना पाठिंबा द्यावा, अशी सर्वप्रथम अट घातली गेली होती. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यास नकार दिला होता. तुम्ही शिवसेनेत या व धनुष्यबानावर निवडणूक लढवा, अशी अट घातली. त्यावर मंडलिकांनी काही दिवस विचार केल्यानंतर आज शिवसेनेत प्रवेश करून लोकसभा लढविण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याला उद्धव ठाकरेंनी तत्काळ हिरवा कंदिल दाखविला. त्याआधी उद्धव ठाकरेंनी स्थानिक सेना नेत्यांशी चर्चा केली होती. राजू शेट्टी यांनी मंडलिक यांना महायुतीत आणण्यात मोठी भूमिका बजावली. अखेर आज मंडलिक यांनी प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूरातून धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे संजय मंडलिक यांनी कोणत्याही स्थितीत लोकसभा लढवायचीच असा निर्धार व्यक्त केला होता. उमेदवारीची घोषणा तत्काळ मेळावा घेऊन जाहीर करावी यासाठी कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर दबाव वाढत होता. त्यामुळेच मागील दोन दिवसापासून घडामोडींना वेग आला व मंडलिक यांनी तत्काळ सेनेत प्रवेश करून सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा व जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
सदाशिवराव मंडलिकांच्या विचारांचा पराभव, पुढे वाचा...