मुंबई- मुंबईतील भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी लोकांच्या तक्रारीनंतर मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहून
शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याजवळील एक रॅंप हटविण्याची मागणी केली आहे. शाहरुख मागील काही वर्षापासून या रॅंपवर
आपली व्हॅनिटी व्हॅन पार्क करत आहे.
मुंबईतील सामान्य लोकांचे म्हणणे आहे की, शाहरुखच्या व्हॅनमुळे एक महत्त्वाचा रस्ता बंद झाला आहे. ज्यामुळे ते बॅंडस्टॅंडच्या माउंट मॅरी चर्चजवळून जात आहेत. लोकांच्या म्हणण्यानुसार, वांद्र्यातील प्रत्येक महिन्यात लागणा-या यात्रेमुळे येथील रस्त्याला महत्त्व येते. अशावेळी हा रस्ता बंद करणे चुकीचे आहे.
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, या रॅंपला हटविण्याची मागणी गेली अनेक वर्षे आम्ही करीत आहोत. मात्र, अद्याप यश मिळाले नाही. मात्र, खासदार पूनम महाजन यांनी यात लक्ष घातल्याने हा रॅंट हटविला जाईल अशी लोकांना आशा वाटत आहे. राज्य सरकार बदलल्यामुळे आमच्या आशा वाढल्या आहेत. आम्ही मागील काही महिन्यापूर्वी वांद्र्यातील काही झोपड्या हटविल्या होत्या. राजकीय हस्तक्षेप कमी झाल्यामुळेच हे करता आले असे लोकांचे म्हणणे आहे.
सामान्य लोकांपेक्षा कोणी मोठे नाही-
पूनम महाजन यांचे म्हणणे आहे की, स्थानिक लोकांनी मला या रस्त्याची कागदपत्रे दाखविली आहेत व हा सरकारी रोड असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या रस्त्याचा वापर सार्वजनिकरित्या सर्वांना करता आला पाहिजे. कोणतेही व्यक्ती अथवा संघटना सामान्य लोकांपेक्षा मोठी नाही. मी लोकांना आश्वस्त करते की त्यांची समस्या लवकरच सुटेल.
शाहरुख खानच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की, हा रोड आणि रॅंप शाहरुख खान याचाच आहे. तसेच मुंबई महापालिकेने अजून येथील जागा अधिग्रहित केली नाही. त्यामुळे मुंबई पालिका जोपर्यंत ही जागा ताब्यात घेत नाही तोपर्यंत शाहरूख खानचाच या रस्त्यावर व रॅंपवर हक्क राहणार आहे.