आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोर्डिंग पास असूनही जेट एअरवेज राजू शेट्टींना विसरले, जेटने मागितली माफी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- खा. राजू शेट्टी बुधवारी मुंबईहून दिल्लीला निघाले. विमानतळावर ‘बोर्डिंग पास’ घेतला असताना त्यांना घेऊन जाण्यास जेट एअरवेज विसरले. त्यानंतर जेटमुळे मनस्ताप झाल्याची तक्रार करणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. दरम्यान, जेटने माफी मागितली असून बदली तिकिटाचे दाेन हजार रुपये परत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

खासदार शेट्टी म्हणाले, ‘मी बुधवारी मुंबई विमानतळावर सकाळी सहा वाजताच्या विमानाचे दिल्लीला जाण्यासाठी बिझनेस क्लासचे तिकीट घेतले होते. नियोजित वेळेनुसार मी सुमारे तासभर आधी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलो. रीतसर बोर्डिंग पास घेतला आणि विमान उड्डाणास वेळ असल्यामुळे व्हीआयपी विश्रामगृहात जाऊन बसलो होतो. नियमानुसार याची मी तेथील रजिस्टरमध्ये नोंददेखील केली. दरम्यान, काही वेळाने मी बोर्डिंगसाठी विश्रामगृहाच्या बाहेर आलो तर बोर्डिंगचा दरवाजा बंद झाल्याचे मला सांगण्यात आले.
 
बोर्डिंग पास घेतलेला असतानाही असे विसरून जाणे विमान कंपनीचा हलगर्जीपणा आहेे, असे मी निदर्शनास आणून दिले. मात्र, जेट एअरवेज कंपनीने सरळ हात वर केले.’
राजू शेट्टी म्हणाले, “लोकसभेच्या स्थायी समितीच्या बैठकीसाठी मला दिल्ली पोहोचणे अत्यावश्यक होते. त्यामुळे मी विमान कंपनीला पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यांनी मला सात वाजताच्या विमानाचे बदली तिकीट दिले. पण, त्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. माझी चूक नसल्याने मी पैसे भरण्यास नकार दिला. मात्र, जेट एअरवेजचे कर्मचारी ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी, मी नाइलाजाने एटीएम कार्डने त्यांना पैसे दिले. त्याबदल्यात पावती मागितली असता कंपनीने पावती देण्यास नकार दिला. आपली चूक नसताना झालेल्या त्रासाबद्दल ‘एअरपोर्ट अॅथाॅरिटी’ कडे आपण तक्रार करणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.
 
नाहक मनस्ताप सहन करावा लागला
एअर इंडिया विमान कंपनीचे अधिकारी शिवसेना खासदार रवी गायकवाड यांच्यातील वादाचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका खासदारासाेबत गैरवर्तणूक करण्यात आली आहे. खासदार राजू शेट्टी कधीही प्रवासात “प्रोटोकॉल’ किंवा मदतनीस घेत नाहीत. त्यामुळेच त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याचे राजू शेट्टी यांचे स्वीय सहायक स्वस्तिक पाटील यांनी सांगितले