आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार रावसाहेब दानवेंना भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा \'चकवा\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत खासदार रावसाहेब दानवे हे कधीच नव्हते. केवळ वरकरणी प्रदेशाध्यक्षपदाच्या स्पर्धेत असल्याचे खासदार दानवेंना भासवण्यात आले. खासदार गोपीनाथ मुंडे यांनाच मराठवाड्यातील नेता प्रदेशाध्यक्ष झालेला नको असल्याने विदर्भातील आमदार देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाले. यामुळे खासदार मुंडेंचा सुंठीवाचून खोकला गेला आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची घोषणा करणार्‍या खासदार दानवेंना मात्र चांगलाच चकवा बसला.
सलग दुसर्‍यांदा खासदार रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. नितीन गडकरींच्या निकटस्थ समजल्या जाणार्‍या दानवेंनी गडकरी पायउतार होताच मुंडेंच्या गुडबुकमध्ये जाण्यासाठी धडपड केली. एकाच वेळी दोन्ही डगरींवर हात ठेवल्याने खासदार दानवेंना हुलकावणी बसली.
खासदार दानवेंचे कुठे चुकले- खासदार दानवेंकडे गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष असताना मराठवाड्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दानवेंनी त्यानंतर विशेष कर्तबगारी दाखवली नाही. गडकरींच्या अपेक्षेला दानवे पात्र ठरले नाहीत. मराठवाडा स्तरावर संघटनेत मुंडेंच्या तुलनेत आपले स्थान निर्माण करण्यास दानवे अपयशी ठरले. मराठा उमेदवार म्हणून पुढे आणण्याचे गडकरींनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले.
प्रदेशाध्यक्ष न करण्याची कारणे
- मराठवाड्यात केवळ गोपीनाथ मुंडेंनाच दोन वेळा प्रदेशाध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी माजी मंत्री हरिभाऊ बागडे व दोन वेळा खासदार दानवे प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार असतानाही त्यांना यापासून दूर ठेवले.
- मराठवाड्यात नेता म्हणून आपणच राहणार याची पुरेपूर काळजी दस्तुरखुद्द मुंडेंकडूनच घेण्यात आली.
- दानवेंना युती शासनाच्या काळातही मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले होते. दिवंगत सूर्यभान वहाडणे यांनी मुंडे-महाजनांविरुद्ध पुकारलेल्या एल्गारमध्ये दानवे सहभागी झाल्याचा त्यांच्यावर ठपका होता.
- दानवे प्रदेशाध्यक्ष झाल्याने महाराष्ट्रासह मराठवाड्यात त्यांचे प्रस्थ निर्माण होईल. मराठवाड्यात सुरू असलेला एकछत्री अंमलही संपुष्टात येईल या भीतीने मुंडेंनीच दानवेंचे नाव लावून धरले नाही.
औरंगाबादेत शिजला कट- फेब्रुवारीत गोपीनाथ मुंडे सर्मथक माजी आमदाराच्या घरी थांबले होते. तेथे प्रदेशाध्यक्ष पदासंबंधीची चर्चा झाली. दानवेंना प्रदेशाध्यक्ष केल्यास जड जाईल, असा सूर बैठकीत निघाल्याचे सूत्रांनी सांगितले. तेव्हाच दानवेंना प्रदेशाध्यक्ष करायचे नाही, असे मुंडेंनी ठरवले होते.
व्यावहारिक निर्णय - फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्याचा निर्णय व्यावहारिक आहे. दोन्ही गटांना मान्य असलेला निर्णय आहे. 2014 ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घेतलेला निर्णय आहे. या निवडणुकांमध्ये युवकांची संख्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक राहील.'' - प्रा. डॉ. श्याम शिरसाट, राजकीय विश्लेषक.
मुलाचे नेतृत्व स्वीकारणार- देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली आपण काम केलेले आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली आहे. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचे नेतृत्व लाभदायी ठरेल.- खासदार रावसाहेब दानवे, जालना