मुंबई- निवडणुकीच्या काळात पक्षाच्या मुखपत्रात वेगवेगळी विधाने मांडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणणारे प्रवक्ते संजय राऊत यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. याशिवाय वयोवृद्ध नेते मनोहर जोशी आणि आजारी सुभाष देसाई यांनाही या पदावरून काढले, परंतु नीलम गोऱ्हे यांना मात्र पदावर कायम ठेवण्यात आले आहे. नव्या प्रवक्ते नेमणुकीत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वरचष्मा असल्याचे पक्षात बोलले जात आहे. नवे प्रवक्ते म्हणून खासदार अरविंद सावंत, नीलम गोऱ्हे, विजय शिवतारे, डॉ. मनीषा कायंदे, डॉ. अमोल कोल्हे आणि अरविंद भोसले यांची नेमणूक झाल्याचे उद्धव यांनी शुक्रवारी पत्रक काढून जाहीर केेले.
शिवसेनेची अधिकृत भूमिका या प्रवक्त्यांमार्फतच मांडली जाईल, वृत्तवाहिन्यांवरील चर्चांत तेच भाग घेतील, असे सांगून राऊत यांना एक प्रकारे पडद्यामागे टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. नवे प्रवक्ते निवडताना आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचेही सांगण्यात येत आहे. आदित्य ठाकरे आता शिवसेनेत सक्रिय होत असून त्यांच्यावर नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे स्वतःची वेगळी टीम बनवणार असून त्याची सुरुवात प्रवक्तेपदापासून झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
वादग्रस्त वक्तव्ये संजय राऊत यांच्या अंगलट
शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीत व नंतर संजय राऊत यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली. त्याचे खंडन करत उद्धव आणि आदित्य यांना पक्षाची अशी काही भूमिका नसल्याचे स्पष्ट करावे लागले होते. भाजपशी मतभेद वाढण्यातही हीच वक्तव्ये कारणीभूत ठरली होती. त्यातच दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी मध्यावधीचे संकेत दिले आणि त्यावर राऊत यांनी आम्ही सरकार पडू देणार नाही, असे विधान केले. उद्धव यांच्या वक्तव्याच्या ते विरोधात होते. त्यामुळेच राऊत यांची गच्छंती झाल्याचे समजते.