आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाळी,खाद्यतेलाच्या साठेबाजांवर एमपीडीए, मोक्कांतर्गत कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डाळी, खाद्यतेल व खाद्यतेल बिया यांचा साठा करून काळाबाजार करणाऱ्या व्यापारी तसेच मॉलविरोधात एमपीडीए तसेच मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची घोषणा अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केली. ही घोषणा करतानाच त्यांनी दिवाळीत तेल व डाळ स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचेही स्पष्ट केले.
मंत्रालयात मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डाळी, खाद्यतेल, खाद्यतेल िबया या अत्यावश्यक वस्तू असून या वस्तूंवर ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत साठा निर्बध लागू करण्याच निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली. साठ्यावर निर्बंध लागू झाल्यानंतर मंगळवारी सकाळपासून राज्यात सर्वत्र धाडी टाकण्यात आल्या. यामुळे डाळींचे भाव ज्या गतीने वाढले होते ते कमी होण्यास सुरुवात झाली आहे. प्रती किलो २०० रुपयांवर गेलेले भाव १७० रुपये किलोपर्यंत आले असून येत्या काही दिवसांत ते आणखी कमी होतील, असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत डाळींच्या कडाडेल्या भावांवर चर्चा झाली. साठेबाजांना रोखण्यासाठी कायदे कठोर नाहीत. त्यामुळे त्यांना तात्काळ जामीन मिळतो, ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी डाळींच्या साठेबाजांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले यानुसार ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठा करणारे आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुढच्या आठ दिवसांत डाळींचे भाव आवाक्यात : साठेबाजांविरोधात राज्य सरकारने उचलेल्या पावलांमुळे आताच डाळींचे भाव १७० पर्यंत आले असून पुढच्या आठ दिवसांत डाळींचे भाव आवाक्यात येतील. तुरींचे उत्पादन तसेच आयात करावी लागणारी डाळ यांचा अंदाज राज्य सरकारकडून घेतला जात होता. मात्र हा अंदाज घेण्यात जवळपास ४ महिने गेले. यामुळे साठेबाजांचा फायदा झाला. यापुढे असे होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, अशी कबूली बापट यांनी दिली.

खाद्यतेल बिया- १ महानगरपालिका क्षेत्र- घाऊक वापाऱ्यांसाठी २००० क्विं.,२ किरकोळ व्यापाऱ्यांसाठी ३०० क्विं., ३ किरकोळ वापऱ्यांसाठी १०० क्विं.
डाळी, खाद्यतेलावर खालीलप्रमाणे निर्बंध लागू
डाळी- १ महानगरपालिका क्षेत्र- घाऊक व्यापाऱ्यांसाठी ३५०० क्विं., किरकोळ वापाऱ्यांसाठी ३०० क्विं. २ अ वर्ग नगरपालिका क्षेत्र- घाऊक वापाऱ्यांसाठी २५०० क्विं., किरकोळ व्यापाऱ्यांसाठी १५० क्विं. ३ इतर ठिकाणी- घाऊक वापाऱ्यांसाठी १५०० क्विं., किरकोळ वापाऱ्यांसाठी १५० क्विं.
खाद्यतेल- १) महानगरपालिका क्षेत्र- घाऊक वापाऱ्यांसाठी १०००क्विं., किरकोळ वापाऱ्यांसाठी ४० क्विं. २) इतर ठिकाणी- घाऊक वापाऱ्यांसाठी ३०० क्विं. किरकोळ वापाऱ्यांसाठी २० क्विं.

एका दिवसात २७० धाडी, मॉलवरही कारवाई
मंगळवारी राज्यात २७० ठिकाणी साठेबाजांवर धाडी टाकण्यात आल्या. यात पुणे १२०, सोलापूर २१, सातारा ४, अमरावती ८, अकोला ४, यवतमाळ ३, औरंगाबाद ६, बीड ३, नागपूर २३, मुंबई ६ अशा ठिकाणांचा समावेश आहे. या धाडीमधून आतापर्यंत २ हजार क्विंटल डाळ जप्त करण्यात आली आहे. या डाळींचा लिलाव करण्यात येणार असून या डाळी रेशन दुकांनावर उपलब्ध करून देण्यात येतील. मॉलमध्ये डाळी तसेच खाद्यतेल तसेच खाद्यतेल बियांचा अवैध साठा दिसून आल्यास त्यांच्यावरही बुधवारपासून कारवाई करण्यात येईल, असे बापट यांनी सांगितले.