आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 7 एप्रिल रोजी होणा-या परीक्षेचा डाटा या वेबसाइटच्या देखभालीचे काम करणा-या कंपनीनेच खराब केल्याची माहिती आता पुढे आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने वेबसाइटची देखभाल करणा-या ‘वॉस्ट इंडिया’ या कंपनी विरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून 7 एप्रिल रोजी राज्यभरातील सर्व जिल्ह्यात परीक्षा घेण्यात येणार होती. लाखो विद्यार्थ्यांनी या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरले होते, परंतु परीक्षेच्या काही दिवस अगोदर विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाबाबतचा डाटा करप्ट झाल्याचे कंपनीने सांगितले होते. त्यामुळे राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळाचा विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. लोकसेवा आयोगाला परीक्षा 18 मेपर्यंत पुढे ढकलावी लागली होती.
डाटा करप्ट कसा झाला याची चौकशी करण्यासाठी लोकसेवा आयोगाने एक समिती नियुक्त केली होती. कोणत्याही व्हायरसमुळे हा डाटा करप्ट झाला नव्हता, तर परीक्षा पुढे जावी म्हणून डाटा करप्ट करण्यात आला, असा शोध चौकशी समितीने लावला आहे.
लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळाचे काम वॉस्ट इंडिया ही कंपनी पाहते. या कंपनीकडे इतरही अनेक परीक्षांचे कामे आहेत. परंतु लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा डेटा करप्ट झाला होता. हा डेटा करप्ट करण्यामध्ये खासगी क्लासचालकांचा हात असण्याची शक्यता आयोगाला वाटते आहे. त्यामुळे आयोगाने या कंपनीविरोधात मंगळवारी पोलिसांकडे रितसर तक्रार नोंद केली आहे.
महाऑनलाईनकडे जबाबदारी
वॉस्ट इंडिया कंपनीला यापुढे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे काम दिले जाणार नाही. ते काम महाऑनलाईन या कंपनीकडे सोपवण्याचा निर्णय झाला असून भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी राज्य लोकसेवा आयोग योग्य ती खबरदारी येईल.’’
एस. डी. ठाकरे, संचालक, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग.
महाऑनलाइनकडे जबाबदारी
वॉस्ट इंडिया कंपनीला यापुढे आयोगाचे काम दिले जाणार नाही. ते काम महाऑनलाइन या कंपनीकडे सोपवण्याचा निर्णय झाला असून भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येईल.’’
एस. डी. ठाकरे, संचालक, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.