आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएससी पूर्वपरीक्षा रविवारीच!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पूर्वपरीक्षा ठरल्या दिवशी म्हणजे रविवारी, 7 एप्रिल रोजीच होईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठामपणे सांगितले. माहिती पुन्हा अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना एसएमएस,
ई-मेलद्वारे कळवण्यात येत असल्याचे सांगून परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नसल्याचे ते म्हणाले.
विधान परिषदेत तारांकित प्रश्नांचा तास संपल्यानंतर विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यासह आमदारांनी लोकसेवा आयोगाच्या सर्व्हरमधील बिघाडाच्या मुद्द्यावर तातडीच्या चर्चेची सूचना मांडली. तीन लाख परीक्षार्थींना दोन दिवसांत माहिती अपलोड करणे शक्य होणार नाही. त्यामुळे परीक्षा 15 दिवस पुढे ढकलण्याची मागणी या आमदारांनी केली. सामान्य प्रशासन राज्यमंत्री फौजिया खान यांनी त्यास नकार दिला. विरोधकांनी गोंधळ केल्याने निर्णयासाठी सरकारने 15 मिनिटे कामकाज तहकूब केले.
आयोगाच्या सर्व्हरमधील माहिती 31 मार्च रोजी करप्ट झाली. त्यामुळे 3 लाख 25 हजार परीक्षार्थींच्या माहितीची अदलाबदल होऊ शकते. त्यामुळे 4 एप्रिलपर्यंत माहिती अपलोड करण्याच्या सूचना परीक्षार्थींना देण्यात आल्या आहेत. आयोगाच्या वेबसाइटवर एक पेज देण्यात आले आहे. सर्व्हरमधील माहिती आपोआप तपासली जाईल. परीक्षार्थींची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. माहिती अद्ययावत होताच परीक्षार्थींना आॅनलाइन हॉलतिकीट दिले जाईल. एखाद्याने माहिती अपलोड केली नसली तरी फॉर्म भरल्याची पावती आणि ओळखपत्र परीक्षा केंद्रावर दाखवल्यास त्यास परीक्षेला बसू दिले जाईल. दरम्यान, विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले होते.

विरोधकांची जोरदार टीका
तुम्हाला तीन लाख विद्यार्थ्यांचे अर्ज सांभाळता येत नाहीत, मग तुम्ही कोट्यवधी शेतकºयांचा सातबारा कसा सांभाळणार. हेच का महाराष्टÑाचे ई- प्रशासन असे म्हणत विरोधकांनी आघाडी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.
सव्वातीन लाख परीक्षार्थी
राज्यात 35 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. एकूण 3 लाख 25 हजार परीक्षार्थी आहेत. यातून अ दर्जाची 131, तर ब दर्जाची 127 पदे भरली जाणार आहेत. बुधवारी 45 हजार विद्यार्थ्यांनी माहिती अपलोड केली असल्याचे फौजिया खान यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. लोकसेवा आयोगाच्या सर्व्हरचे काम वॉस्ट इंडिया प्रा. लि. या कंपनीकडे आहे.