आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अखेर MPSC परीक्षा पुढे ढकलली; आता 12 मे रोजी परीक्षा होण्याची शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पूर्वपरीक्षा ठरल्या दिवशी म्हणजे रविवारी, 7 एप्रिल रोजीच होईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठामपणे सांगितल्यानंतर MPSC ची परीक्षा चार-आठ दिवस पुढे ढकलली तर काय आभाळ कोसळेल काय? असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर दोन तासाच सरकारने विरोधकांशी चर्चा करुन अखेर परीक्षा पुढे ढकलली. आता ही परीक्षा 12 मे 2013 रोजी घेण्याची शक्यता राज्य लोकसेवा आयोगाने व्यक्त केली आहे.

राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व्हरमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे आयोगाच्या सर्व्हरमधील माहिती नष्ट झाली होती. त्यामुळे परीक्षा किमान 15 दिवस पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. तशीच मागणी विरोधी पक्षांच्या आमदारांनी बुधवारी विधान परिषदेत केली होती. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यास नकार देत सांगितले होते की, परीक्षार्थीची माहिती पुन्हा अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना एसएमएस, ई-मेलद्वारे कळवण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची गरज नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना 4 एप्रिलपर्यंत आपली वैयक्तिक माहिती पुन्हा अपलोड करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या. मात्र हा वेळ खूपच कमी असल्याची तक्रार पुन्हा परीक्षार्थींकडून करण्यात येऊ लागली. याचा संदर्भ घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या निर्णयाशी असहमती दर्शवत एमपीएससीच्या परीक्षा चार-आठ दिवस पुढे ढकलली तर काय आभाळ कोसळेल का? असे मत मांडले. दरम्यान, आपले हे वैयक्तिक मत असून, याचा विचार करण्यास हरकत काय, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सरकारने विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली व अखेर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. आता ही परीक्षा 12 मे रोजी होण्याची शक्यता आयोगाने वर्तविली आहे.

सव्वातीन लाख परीक्षार्थी- राज्यात 35 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. एकूण 3 लाख 25 हजार परीक्षार्थी आहेत. यातून 'अ' दर्जाची 131, तर 'ब' दर्जाची 127 पदे भरली जाणार आहेत. बुधवारी 45 हजार तर, गुरुवारी दीड लाख विद्यार्थ्यांनी माहिती अपलोड केली होती. मात्र तब्बल लाखभर परीक्षार्थींना माहिती अपलोड करायची बाकी होती. त्यातच सर्व्हरवर लोड येत असल्याने व दोन दिवसात सर्व नियोजन होणार नसल्याने अखेर सरकारने परीक्षा पुढे ढकलली. लोकसेवा आयोगाच्या सर्व्हरचे काम वॉस्ट इंडिया प्रा. लि. या कंपनीकडे आहे.