आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता एसटीचे तिकीट घरबसल्या करा बुक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘गाव तेथे एसटी’चा हा वसा घेतलेल्या एसटी महामंडळाने आता कात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धावणारा ‘लाल डब्बा’ जुनी झाल्याने आणि सोयी-सुविधांची त्यात वानवा असल्याने नव्या बसेस ताफ्यात आणण्यात येणार आहेत. यासाठी लाल गाड्या टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील. तसेच एसटीचे तिकीट घरबसल्या बुक करण्याची सोयही उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती परिवहन विभागाचे अप्पर सचिव सुधीर श्रीवास्तव यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

राज्यात एसटी धावणारे एकूण १८४०२ मार्ग असून बसेसची संख्या १६५२४ आहे. वर्षभरात एसटीने २५६ कोटी ३० लाख नागरिक प्रवास करतात. प्रत्येक गावात एसटी जात असली तरी त्याच्या अनियमित वेळा आणि गाड्यांची अवस्था पाहता नागरिक खासगी गाड्यांनाच पसंत करतात. त्यामुळे खासगी वाहतूक बाेकाळली अाहे. परिणामी ‘एसटी’ ताेट्यात अाहे. आता एसटी नफ्यात आणण्याचा प्रयत्न परिवहन मंत्री दिवाकर रावते करत असून त्यासाठी विविध नव्या योजना आखल्या जात आहेत. श्रीवास्तव यांनी सांगितले, सध्या असलेल्या एसटी बसचे आयुर्मान आम्ही ८ वर्षांवर आणले आहे. या बसेस आठ ते दहा वर्षे धावत आहेत. हे आयुर्मान पाच वर्षांवर आणण्याचा प्रयत्न आहे. यासाठी जुन्या गाड्या टप्प्याटप्प्याने बंद करून हिरकणीसारख्या चांगल्या गाड्या आणणार आहोत. नव्या गाड्यांमध्ये प्रवाशांना प्रवासाचा कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. ’

ट्रॅकिंग सिस्टिम बसवणार
एसटीच्या सर्व गाड्यांमध्ये व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम बसवण्यात येणार आहे. त्यामुळे कोणती बस कुठे आहे आणि किती वेळात पोहोचेल याची माहिती क्लिकवर मिळेल. यासाठी एक मोबाइल अॅप्लिकेशनही तयार करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील ई-सेवा केंद्रांवर तिकीट देण्याची सोयही उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे नागरिकांना घर बसल्या तिकीट बुक करून बसच्या वेळेलाच एसटी थांब्यावर वा स्टँडवर जाणे सोपे होईल. तसेच बसमध्ये किती जागा रिकाम्या आहेत याची माहितीही या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होणार आहे, असेही श्रीवास्तव यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...