आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. अांबेडकर जयंतीला बुद्धांवर काॅफी टेबल बुक, मुडशिंगीकरांनी जमवले ३५ लाख रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला अहिंसा, करुणा आणि शांततेचा विचार जगभर पसरावा आणि आजच्या तरुण पिढीने बुद्धांनी दाखवलेला मार्ग अनुसरावा या ध्येयाने झपाटलेल्या एका प्रसिद्ध छायाचित्रकाराने बुद्धांशी संबंधित सर्व प्रमुख स्थळांची छायाचित्रे आणि माहिती असलेले कॉफी टेबल बुक सिद्ध केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढील वर्षी साजऱ्या होत असलेल्या १२५ व्या जयंतीदिनी हे पुस्तक प्रकाशित करण्याची तयारी त्यांनी चालवली आहे.

गेली पंधरा वर्षे छायाचित्रकार या नात्याने गंगा आणि गंगेतील प्रदूषण या विषयावरच्या संशोधनानिमित्त गंगेच्या खोऱ्यात पायपीट करत असताना विजय मुडशिंगीकर यांना बुद्धांची पदचिन्हे गवसली. सारनाथ, बुद्धगया, वैशाली, राजगिरी, संबीसा आदी शहरांमधून फेरफटका मारण्याची संधी मिळाली. येथेच त्यांना बुद्धाची प्राचीन शिल्पे, अस्तित्वाच्या खाणाखुणा सापडल्या. बुद्धांच्या विचारांची तरुण पिढीला नव्याने ओळख करण्यासाठी विजय मुडशिंगीकर यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ तथागत बुद्धाज फुटप्रिंट’ ही ९० मिनिटांची चित्रफीत तयार केली आहे. या कामासाठी आपले राहते घर आणि पत्नीचे दागिने मुंबई बँकेत गहाण ठेवून सुमारे ३५ लाख रुपये उभे केले व हाती घेतलेले काम पूर्ण केले.
युद्ध नको, बुद्ध हवा : मुडशिंगीकर
आज भारतच नव्हे, जगामध्ये युद्धखोरी आणि अशांतता सर्वत्र पसरली आहे. अनेक देशांमध्ये अराजकाचे वातावरण आहे. कावेरी प्रश्नावरून कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात ही राज्ये सरदार प्रकल्पावरून एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली आहेत. अशा अशांततेच्या वातावरणात असलेल्या देशात कधी काळी गौतम बुद्धांसारख्या अहिंसा, शांतता आणि समतेचा संदेश घेऊन पदभ्रमण करणारा महामानव जन्माला आला होता हेच आपण विसरलो आहोत.