आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुळा-मुठा नदी प्रदूषणमुक्तीसाठी 990 काेटींच्या प्रकल्पास मान्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पुणे शहरातील मुळा-मुठा नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी राष्ट्रीय नदी कृती योजनेअंतर्गत ९९० कोटी २६ लाख रुपयांचा प्रकल्प राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात अाली. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून वेळोवेळी उपलब्ध होणारा निधी पुणे महापालिकेस त्वरित वितरित करण्यासही मान्यता देण्यात आली.

केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाच्या राष्ट्रीय नदी कृती योजनेत या नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी काम केले जाणार अाहे. नदीकाठावरील शहरात सांडपाण्यापासून होणारे नदीचे प्रदूषण रोखणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्त्वे व अटींनुसार राज्यातील मंजूर प्रकल्पांची अंमलबजावणी करणे, केंद्राचा निधी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेस त्वरित उपलब्ध करून देणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हिश्शापैकी काही भार किंवा प्रस्तावाच्या वाढीव किमतीचा भार राज्य शासनावर न टाकता स्थानिक स्वराज्य संस्थेने उचलणे अशा धोरणात्मक बाबींनादेखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. पुणे शहरातील मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जायका) संस्थेकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी केंद्राने प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पाच्या ९९० कोटी २६ लाख रुपयांच्या प्रस्तावास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी केंद्र शासन ८५ टक्के (८४१.७२ कोटी) आणि पुणे महापालिका १५ टक्के (१४८.५४ कोटी) निधी देणार आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे मुळा व मुठा नदी प्रदुषणमुक्त हाेण्यास मदत हाेणार अाहे. तसेच या नद्यांमधून पंढरपूरच्या चंद्रभागात येणारे प्रदुषित पाणीही थांबू शकेल.

सहा वर्षांची डेडलाइन
मुळा- मुठा नदीत येणारे सांडपाणी अडविणे किंवा वळविणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) बांधणे, मत्स्यबीज केंद्र, बॉटनिकल गार्डन, सुलभ शौचालयांची उभारणी आणि जनजागृती अादी कामे केली जातील. ही कामे सहा वर्षांच्या कालावधीत म्हणजेच ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांचे वेळोवेळी त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षण करण्यात येईल.

दिव्य मराठीने वेधले लक्ष
केंद्राकडून निधी प्राप्त होवूनही राज्यातील लालफितीच्या कारभारामुळे मुळा-मुठा नदीच्या प्रदूषणमुक्तीचे काम सुरू होवू शकत नसल्याचे वृत्त दैनिक दिव्य मराठीने ११ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिध्द केले होते.
बातम्या आणखी आहेत...