आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांनी २५ मिनिटे जाहिराती का बघाव्यात?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अलीकडेच मुंबईतील मल्टिप्लेक्समध्ये एक चित्रपट सुरू असताना जाहिरातींचा नुसता भडिमार सुरू होता. प्रेक्षकांतील सॉफ्टवेअर इंजिनिअर्सच्या एका समूहाने मल्टिप्लेक्सच्या व्यवस्थापकाला जाहिराती दाखवणे बंद करण्याची विनंती केली. परंतु ते ऐकत नव्हते. त्यामुळे त्यांना दांडगाई करावी लागली. गेल्या दोन महिन्यांत मुंबई, दिल्ली, जयपूर, इंदूर, अहमदाबादसारख्या शहरातील प्रेक्षकांनी मल्टिप्लेक्स व्यवस्थापकांशी चर्चा करून चालू शोमधील जाहिराती बंद करण्यास भाग पाडले. खरे तर गेल्या वर्षात चित्रपटगृहातील चित्रपटादरम्यान झळकणाऱ्या जाहिरातींचा अवधी ४ मिनिटांवरून २५ मिनिटांवर पोहोचला आहे. परंतु प्रेक्षकाने मल्टिप्लेक्समध्ये २५ मिनिटे जाहिराती का पाहाव्यात, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे दोन-अडीच तासांचा चित्रपट नाहक तीन तासांनी संपतो.

मल्टिप्लेक्सचे मालक अगोदरपासूनच स्वनिर्मित नियमानुसार चित्रपट सुरू होण्याआधी चार मिनिटांचा ट्रेलर आणि जाहिराती दाखवत आले आहेत, शिवाय मध्यंतरातही १० मिनिटांची जाहिरात माथी मारली जाते. त्यात ४ ते ५ मिनिटांच्या एक-दोन जाहिराती व ट्रेलर दाखवले जात. गेल्या १० वर्षांत प्रत्येक छोट्या-मोठ्या शहरांत मल्टिप्लेक्स सुरू झाले आहेत. मल्टिप्लेक्सची साखळीतील मोठे खेळाडू असलेले पीव्हीआर, आयनॉक्स, कार्निव्हलचे देशभरात १०० हून अधिक िचत्रपटगृहे आणि ४०० पेक्षा जास्त सिंगल स्क्रीन आहेत. फन सिनेपोलिसचे ५५ मल्टिप्लेक्स आणि २५० छोटे चित्रपटगृह आहेत. या साखळी मल्टिप्लेक्स चालकांनी गेल्या दोन वर्षांत चित्रपटादरम्यान जाहिराती आणि ट्रेलरचा अवधी ४ मिनिटांहून २५ मिनिटांपर्यंत रेटला आहे.

यंदा प्रदर्शित झालेले सलमान, शाहरुख, संजल लीला भन्साळी यांच्या अडीच तासांच्या चित्रपटांच्या प्रेक्षकांसाठी हा वाढलेला अवधी मोठी डोकेदुखी ठरल्याचा अनुभव आहे. चित्रपटासाठी संपूर्ण तीन तास आणि येण्याजाण्याचा एक तास धरल्यास प्रेक्षकांचे चार तास व्यर्थ जात आहेत. ते कोणालाही मान्य नाहीत. गेल्या ४ महिन्यांत रिलीज झालेल्या चित्रपटांदरम्यान १० मिनिटांत सुमारे ५ चित्रपटांचे ट्रेलर व १५ मिनिटांच्या जाहिराती दाखवण्यात आल्या.

चित्रपटाचे निर्मातेदेखील वाढलेल्या अवधीवरून नाराज आहेत. निर्मात्यांना ट्रेलर दाखवण्यासाठी चारपट अधिक पैसे मोजावे लागत आहेत. सामान्यपणे एक मिनिटाचा ट्रेलर दाखवण्यासाठी प्रति आठवडा ३ हजार रुपये निर्माता मोजतो. परंतु दोन वर्षांत बड्या स्टारच्या चित्रपटांसोबत ट्रेलर दाखवण्यासाठी चारपट अधिक अर्थात १२ हजार रुपये प्रतिमिनिट, प्रति स्क्रीन मोजावे लागतात.
या प्रकरणात चित्रपट निर्माता आणि प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष मुकेश भट म्हणाले, मल्टिप्लेक्सचे मालक केवळ आपला व्यवसाय वाढावा आणि पैसे कमवण्यात गुंतले आहेत. प्रेक्षक जाहिरातींच्या माऱ्याला वैतागले आहेत. म्हणूनच लोकांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने त्यासंबंधी नियमावली तयार केली पाहिजे. टीव्हीसाठी जाहिरातीच्या वेळेचा अवधी निश्चित करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मागे मार्गदर्शक तत्त्वे जारी केली हाेती. अगदी त्याचप्रमाणे चित्रपटगृहांसाठीदेखील नियम असावेत. आम्ही या गोष्टीला विरोध करत आहोत. परंतु मल्टिप्लेक मालक स्वत:च नियम तयार करू लागले आहेत.
बातम्या आणखी आहेत...