आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Airport On Alert After Threat Message In Toilet

26 जानेवारीला मुंबई विमानतळावर हल्ला करण्याची ISISच्या नावाने पुन्हा धमकी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- येत्या 26 जानेवारीला म्हणजे भारताच्या प्रजासत्ताक दिनी मुंबई विमानतळावर दहशतवादी हल्ला करणार असल्याची धमकी विमानतळाच्या शौचालयातील भिंतीवर इसिसच्या नावाने दिली गेली आहे. मागील आठवड्यातही अशाच प्रकारची धमकी देण्यात आली होती. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे तीन दिवसांच्या भारत दौर्‍यासाठी 25 जानेवारीला येत आहेत. प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे ओबामा प्रमुख अतिथी आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रजासत्ताक दिन सोहळ्याला येण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे भारत सरकारने सुरक्षा यंत्रणांना कडक सूचना दिल्या आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे प्रजासत्ताक दिन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्यामुळे पाकिस्तानमधील कट्टरवादी लोकांचा तीळपापड झाला आहे. ओबामांच्या दौ-यावेळी भारतात हल्ला करून दहशत माजवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावर हल्ला करण्याच्या धमकीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. दरम्यान, भींतीवर लिहलेला संदेश हा येथील भुरट्या इस्लामिक कट्टरवाद्यांनी लिहला असण्याची शक्यता पोलिस पडताळून पाहत आहेत. मागील आठवड्यातही अशाच प्रकारची धमकी देण्यात आली होती. मात्र ती केवळ धमकीच ठरली होती. असे असले तरी ओबामांच्या दौ-यामुळे सुरक्षा यंत्रणांनी कोणतेही कसूर न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतातील लष्करी तळ, राष्ट्रीय महामार्ग तसेच शाळांना टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानमधील दहशतवाद्यांकडून होणार असल्याची शक्यता भारतीय लष्कराने व्यक्त केली आहे. पाकव्याप्त कश्मीरातून भारतात घुसखोरी करण्यासाठी 200 दहशतवादी तयार असल्याची माहिती लष्करातील लेफ्टनंट जनरल के. एच. सिंग यांनी दिली आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दौर्‍यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ले करण्याचा कट रचल्याच्या वृत्ताला संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दुजोरा दिला आहे. दहशतवाद्यांकडून अशा प्रकारे घातपाती कारवाया होण्याची शक्यता आहे, मात्र दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी आणि सडेतोड उत्तर देण्यासाठी भारत सज्ज आहे, असे पर्रीकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर राजधानी दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, कोलकातासह जम्मू-कश्मीर आणि देशभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
अनिस अन्सारीवर सायबर दहशतवादाचा गुन्हा- वांद्रे येथील अमेरिकी शाळेला टार्गेट करण्याचा कट रचणार्‍या अनिस अन्सारी याच्यावर एटीएसने सायबर दहशतवादाचा गुन्हा दाखल केला आहे. एटीएसने शिवडी कोर्टात दाखल केलेल्या 728 पानी आरोपपत्रात माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (फ) हे कलम लावले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून दहशतवाद माजविण्याचा प्रयत्न करणार्‍याविरुद्ध अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याची बहुधा ही पहिलीच घटना असल्याचे एटीएसच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे.