आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे नेत्यांनी ठरवलेले मुंबईतील संवाद मेळावे ठाकरेंकडून अचानक रद्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या मनसेच्या पुनर्बांधणीच्या प्रक्रियेला पहिलाच झटका बसला अाहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील संवाद मेळावे अचानक रद्द केले आहेत. एप्रिल महिन्याच्या अखेरीस मनसेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी खुद्द राज ठाकरे या मेळाव्यांना हजेरी लावणार असल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली होती. मात्र पक्षप्रमुखांच्या संमतीविनाच काही नेत्यांनी या मेळाव्यांचे आयोजन केल्याचे कळताच राज यांनी हे मेळावेच रद्द केल्याची चर्चा अाहे.  
 
पराभवांमुळे अालेले नैराश्य दूर सारत मनसेच्या पुनर्बांधणीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे मेळावे आयोजित घेणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. खुद्द राज यांनी मनसेच्या वर्धापन दिन मेळाव्यातही लवकरच आपण सर्व नेतेमंडळींसोबत तुमच्या भेटीला येणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार २७ एप्रिल ते ५ मे दरम्यान मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात संवाद मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत आठवड्याभरापूर्वी मनसेचे नेते आणि विभागाध्यक्षांची बैठक पार पडली होती. यात दीड ते दोन हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते बसू शकतील अशा सभागृहांची आपापल्या विभागात उपलब्धता तपासण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सर्व विभागात हाॅलचे बुकिंगही करण्यात आले होते. मात्र अचानक मेळावे रद्द करण्यात आल्याने  पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. 
 
राज यांनी दाखवला नेत्यांना कात्रजचा घाट
लोकसभानिहाय संवाद मेळावे रद्द करून राज यांनी आपल्याच नेत्यांना ‘कात्रजचा घाट’ दाखवल्याची चर्चा मनसेत रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षनेतृत्वाच्या कार्यपद्धतीवरून एका बैठकीत नेते आणि राज ठाकरे यांच्यात खडाजंगी झाली होती. त्या वेळी राज यांनी नेत्यांनाही खडे बोल सुनावले होते. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संवाद मेळाव्यांच्या आयोजनासाठी नेत्यांनी बैठक घेतली होती. या बैठकीला राज ठाकरे मात्र उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे या बैठकीत नेत्यांनी मेळाव्यांच्या आयोजनाचा निर्णय परस्पर घेतल्याची चर्चा मनसेत आहे. नेमकी हीच बाब खटकल्याने राज यांनी ऐनवेळी मेळावे रद्द केल्याचे बोलले जात आहे.
 
 
 
बातम्या आणखी आहेत...