आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंडली मॅच नव्हे, अस्मितेची लढाई, भाजपने विश्वासू मित्र गमावला: उद्धव ठाकरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपअध्यक्ष म्हणतात “फ्रेंडली मॅच’ परंतु संकटाच्या वेळी पाठिशी उभा राहाणारा मित्र तुम्ही गमावला आहे. त्यामुळे ही “फ्रेंडली मॅच’ नसून मराठी माणसाच्या अस्तित्वाची अस्मितेची लढाई आहे. ही प्रचार सभा नव्हे, विजयी सभा आहे. युतीच्या जोखडातून बाहेर पडलोय, आता युतीच्या राजकारणात पुन्हा पडायचे नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर प्रखर टीका केली. चिराबाजार येथील शिवसेनेच्या पहिल्या प्रचारसभेत शनिवारी ते बोलत होते. महाराष्ट्रात भाजपने एक विश्वासू मित्र गमावला असल्याचे सांगत त्यांनी भविष्यातील धोरणच जाहीर करून टाकले.

सभेस उपस्थित शिवसैनिकांसमोर बोलताना उद्धव म्हणाले, “मुंबई मनपावर शिवसेनेचा भगवा फडकणार, असे मथळे २४ तारखेला दिसतील. मी घेतलेले निर्णय शिवसैनिकांनी खळखळ न करता मान्य केले. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. भाजप अध्यक्ष म्हणाले, ही फ्रेंडली मॅच आणि इतर लिंबूटिंबू म्हणतात महाभारत होणार. कौरव-पांडव फ्रेंडली मॅच कशी? महाभारत असेल तर बृहन्नडा, शिखंडी कोण ते स्पष्ट करा.  मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो कारण त्यांनी आमच्या विजयाची मुहुर्तमेढ रोवली आहे. शिवसेनेला जो आव्हान देतो तो पुढच्या राजकारणात दिसत नाही हा इतिहास आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली. आज ते कोठे आहेत ते सगळ्यांना ठाऊक आहे.

आमच्यावर पारदर्शक कारभारावरून टीका करत आहेत. परंतु केंद्र सरकारच्या अहवालात देशात सगळ्यात जास्त पारदर्शक मुंबई मनपा असल्याचे जाहीर झाले आणि “बोबडया’ लोकांची बोबडी वळली, अशा शब्दांत त्यांनी मुंबईतील नामांकित भाजप नेत्यावर टीका केली. मी अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. त्यांनी वेळेवर अहवाल दिला. स्वतःच्या हाताने दात घशात घालून घेण्यासारखी त्यांची स्थिती झाली असून त्यांचे बोळके झाले आहे. मुंबईच्या विकासात भाजपचा संबंध नाही, अशी टीकाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

परिवर्तन हवे तर निवडणुका घ्या...
- पारदर्शक कारभार म्हणजे काय, असा प्रश्न करून उद्धव म्हणाले, मुख्यमंत्र्यांना परिवर्तनाची घाई का झाली, समजत नाही. अजून अडीच वर्षे आहेत. त्यांना परिवर्तन हवे तर त्यांनी निवडणुका घ्याव्यात. 
- भाजपचा जाहीरनामा अजून तयार नाही. मुंबईकरांकडून अपेक्षा, सूचना मागवताहेत. बाहेरून आलेल्यांना मुंबईकरांच्या समस्या कशा समजणार, अशी टीका उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.
- काँग्रेसला खड्डेच दिसणार कारण त्यांना खड्ड्यातच जायचे आहे. त्यांनी देशाला खड्डयात घातले, आता प्रचारासाठी मुद्देच नाहीत.
- आम्ही मुलांच्या पाठीवरील ओझे कमी करून टॅब दिले. मात्र तिसऱ्या इयत्तेतल्या मुलीच्या दप्तरात पिस्तुल कसे आले?

यांचे मंगळावरही सदस्य
भाजप हा आंतरराष्ट्रीय पक्ष आहे. त्यांचे मंगळावरही पाच लाख सदस्य आहेत, परंतु त्यांना गोव्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मिळत नाही. तेथेही मोदींचाच चेहरा. उद्या ते बाजार समितीचेही अध्यक्ष होतील, असे उद्धव म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका असल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीची आठवण झाल्याचे ते म्हणाले.

अमित शहांना दिले आव्हान
अमित शहा यांच्या मनभेद, मतभेदांच्या वक्तव्यावर उद्धव यांनी शहांना मुंबईत येण्याचे आव्हान दिले. ते म्हणाले, मुंबईत या मनभेद, मतभेद काय ते कळू द्या. आम्ही हिंदुत्व,राष्ट्रीयत्वही सोडले नाही. आमचे मतभेद आहेत. नोटबंदीमुळे गरिबांना त्रास झाला. शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न झाला. याबाबत आमचे मतभेद आहेतच. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी एका पक्षाच्या प्रचाराला जाऊ नये असे मी म्हणत असतो. सगळ्या निवडणुकांच्या प्रचाराला पंतप्रधान, मुख्यमंत्री जातात. मग ते काम कधी करणार?
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...