आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार जागांवरून आघाडीची जागावाटप घोषणा रखडली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गोरेगाव, मालाड, धारावी आणि अँटॉप हिल येथील वॉर्ड मिळावेत ही मागणी लावून धरली. या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अडून बसल्याने जागावाटपाची घोषणा बुधवारी ढकलण्यात आली आहे.
‘वर्षा’ बंगल्यावर सोमवारी झालेल्या चर्चेमधून तोडगा निघू न शकल्याने राष्ट्रवादीच्या मुंबईतील नेत्यांना शरद पवार यांनी पाचारण केले होते. या बैठकीत पवार यांनी काही जागांवर तुम्हीही तडजोडीसाठी तयार राहा व काही जागांवर त्यांनीही तडजोड करावी. आपण त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलून घेतो, असे सांगितले. त्याप्रमाणे शरद पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यामुळे आता पुन्हा उद्या किंवा परवा जागावाटपासहित आघाडीच्या घोषणेवर शिक्कामोर्तब होईल, असे राष्ट्रवादीतील सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
दरम्यान, पश्चिम उपनगरातील गोरेगावमधील वॉर्ड क्रमांक 50 साठी माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांचे भाचे समीर देसाई प्रयत्नशील आहेत. त्यांचा वॉर्ड 49 हा महिला आरक्षित झाल्याने त्यांनी बाजूच्या वॉर्डमधून जागा मागितली आहे. मात्र कामगार नेते शरद राव यांचे पुत्र शशांक यांना वॉर्ड 50 मधूनच राष्ट्रवादीची उमेदवारी हवी असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. ही जागा कोणाच्या वाट्याला जाते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादीचे महापालिकेतील माजी गटनेते रवींद्र पवार यांना भांडुप येथील वॉर्ड क्रमांक 143 मधून निवडणूक लढवायची आहे. पण त्या जागेवर काँग्रेस दुस-या क्रमांकावर आहे. तसेच राष्ट्रवादीला धारावीमधूनही 175 क्रमांकाचा वॉर्ड हवा आहे. मात्र धारावीमध्ये काँग्रेस खासदार एकनाथ गायकवाड आणि महिला व बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे काँग्रेस तो वॉर्ड सोडण्यास अजिबात तयार नसल्याचे समजते. तसेच राष्ट्रवादीचे सध्याचे गटनेते नियाझ वणू यांच्यासाठीही अँटॉप हिल येथील वॉर्ड पक्ष मागत असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली. वणू यांचा वॉर्ड महिला आरक्षित झाल्याने त्यांना दुस-या ठिकाणाहून निवडणूक लढवावी लागणार आहे.
जागावाटप आणि इतर महानगरपालिकांमध्ये आघाडी करण्याबाबत आज मुख्यमंत्री चव्हाण यांच्या बंगल्यावर बैठक झाली. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंग आणि राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष नरेंद्र वर्मा, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. बैठक संपल्यावर माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी सांगितले की बुधवारपर्यंत आघाडीचे जागा वाटप जाहीर होईल. तसेच ठाणे, नाशिक, नागपूर, उल्हासनगर, अकोला येथील महानगरपालिकांबाबत बोलणी सुरू असून लवकरच त्याचीही घोषणा होईल, असे भुजबळांनी सांगितले.